वृत्तसंस्था/गुवाहाटी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे खेळविण्यात येत असलेल्या कनिष्ठांच्या विश्व मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत इंडोनेशियाकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच कांस्यपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने माजी विजेत्या कोरियाचा पराभव करुन उपांत्य फेरी गाठत आपले पहिले ऐतिहासिक पदक निश्चित केले होते. पण त्यांना उपांत्य फेरी पार करता आली नाही. इंडोनेशियाने उपांत्य फेरीच्या लढतीत भारताचा 45-35, 45-21 असा पराभव केला. आता या स्पर्धेत चीन आणि जपान यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर इंडोनेशियाची अंतिम फेरीत गाठ पडेल.
कोरियाला पराभूत करणाऱ्या भारतीय संघामध्ये इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीसाठी एक बदल करण्यात आला. विशाखा टोप्पोच्या जागी अनया बिस्तला संधी देण्यात आली होती. मुलांच्या दुहेरीतील सामन्यात भारताच्या भार्गवराम अरिगेला आणि विश्वतेज गोबरु यांनी इंडोनेशियाच्या मुबारक आणि रेहान प्रामोनो यांचा 9-5 असा पराभव केला. त्यानंतर मुलींच्या एकेरीतील सामन्यात भारताच्या उन्नती हुडाने इंडोनेशियाच्या थेलीता विरय्यावेनचा 18-16 असा पराभव केला. त्यानंतर मुलांच्या एकेरीतील सामन्यात इंडोनेशियाच्या मोहम्मद उबेदिल्लाने भारताच्या रोनक चौहानचा 11-5 असा पराभव करत आपल्या संघाला 4 गुणांची आघाडी मिळवून दिली.









