► वृत्तसंस्था/ श्यामकेंट (कझाकस्तान)
रविवारी येथे झालेल्या 2025 च्या 16 व्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी यशस्वी कामगिरी करताना 50 सुवर्णपदकांसह 99 पदकांची लयलूट केली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताचा नेमबाज अंकूर मित्तलने नव्या विश्वविक्रमासह पुरुषांच्या डबल ट्रॅप नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.
या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय नेमबाजांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. दक्षिण कोरियात यापूर्वी झालेल्या 15 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या तुलनेत कझाकस्तानमधील स्पर्धेत अधिक 35 पदकांची कमाई केली. कझाकस्तानमधील झालेल्या या स्पर्धेत यजमान कझाकस्तानने पदक तक्त्यात दुसरे तर चीनने तिसरे स्थान पटकाविले. पुरुषांच्या दुहेरी ट्रॅप नेमबाजी प्रकारात अंकूर मित्तलने 4 फेऱ्यांमध्ये 107 शॉट्स नोंदवण्याचा नवा विश्वविक्रम केला. या क्रीडाप्रकारात कझाकस्तानच्या चिकूलेव्हने 98 शॉट्ससह रौप्य तर कुवेतच्या अहमद अल्फासीने 96 शॉट्ससह कास्यपदक मिळविले. पुरुषांच्या दुहेरी सांघिक ट्रॅप नेमबाजीत भारताच्या अंकूर मित्तल, भानूप्रताप सिंग आणि हर्षवर्धन कविया यांनी कास्यपदक पटकाविले.
पुरुषांच्या 25 मी. सेंटरफायर वयैक्तिक पिस्तूल नेमबाजी प्रकारात भारताच्या राजकंवरसिंग संधूने 583 शॉट्ससह सुवर्णपदक तर कोरिया प्रजासत्ताकच्या जेकूनने 580 शॉट्ससह रौप्य आणि ईराणच्या जावेद फोरोबीने 579शॉट्ससह कास्यपदक घेतले. या क्रीडाप्रकारात भारताचा ऑलिम्पिक नेमबाज गुरुप्रितसिंगने चौथे स्थान पटकाविले. त्याचे कास्यपदक थोडक्यात हुकले. 25 मी. सेंटरफायर सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या संधू, गुरुप्रित आणि अंकूर गोयल यांनी 1733 गुण सुवर्ण तर व्हिएतनामने 1720 गुणांसह रौप्य आणि ईराणने 1700 गुणांसह कास्यपदक घेतले.
महिलांच्या 50 मी. रायफल प्रोनी नेमबाजी प्रकारात भारताच्या सिफ्ट कौर समराने 617.9 गुणांसह तिसऱ्या स्थानासह कास्य पदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात समराने कौशिक आणि द. कोरियाच्या चोईला मागे टाकले. महिलांच्या 50 मीटर सांघिक रायफल प्रोनी नेमबाजी प्रकारात सुरभी भरद्वाज आणि विदारसा विनोद आणि मानिनी यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले. महिलांच्या डबल टॅप नेमबाजी प्रकारात भारताच्या अनुष्कासिंग भाटीने 93 गुणांसह सुवर्ण, भारताच्या राजकुंवर इंगळेने 89 गुणांसह रौप्य आणि यशिया कॉन्ट्रॅक्टरने 87 गुणांसह कास्यपदक मिळविले.









