वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या 2025 च्या विश्व स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने दर्जेदार कामगिरी करताना तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांसह एकूण पाच पदकांची कमाई केली. या क्रीडा प्रकारातील इतिहासात भारतीय संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय स्पीड स्केटिंग संघाचे मंगळवारी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
भारताचा अनुभवी स्केटर आनंदकुमार वेलकुमारने वरिष्ट पुरूषांच्या 1000 मी. स्प्रिंट प्रकारात 1:24:924 असा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा तो पहिला भारतीय स्केटर ठरला आहे. त्यानंतर या स्पर्धेत पुरूषांच्या मॅरेथॉनमध्ये आनंदकुमारने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले तसेच त्याने 500 मी. स्प्रिंट या प्रकारात कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये आनंदकुमारने दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत कृश शर्माने कनिष्ठ पुरुषांच्या 1000 मी. स्प्रिंटमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. तर या क्रीडा प्रकारात भारताच्या अनिश राजने कांस्यपदक घेतले. सदर स्पर्धा 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये घेण्यात आली होती. अखिल भारतीय रोलर स्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष तुळसीराम अगरवाल यांनी भारतीय स्पीड स्केटिंग संघाचे कौतुक केले आहे.









