8 सुवर्ण, 10 रौप्य व 6 कांस्यपदकाची कमाई : चीन अव्वल तर भारताला दुसरे स्थान
वृत्तसंस्था/ गोमी, दक्षिण कोरिया
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजवताना अखेरच्या दिवशीही पदकांची लयलूट केली. शनिवारी शेवटच्या दिवशी सुवर्णपदक जरी मिळाले नसले तरी भारतीय खेळाडूंनी रौप्यपदकाची कमाई केली. चीनने अपेक्षेप्रमाणे अव्वलस्थान मिळवताना स्पर्धेतील आपला दबदबा ठेवला. भारताने 8 सुवर्ण, 10 रौप्य व 6 कांस्यपदकासह एकूण 24 पदके मिळवत दुसरे स्थान पटकावत स्पर्धेचा समारोप केला.
शनिवारी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मीटर प्रकारात 15 मिनिटे 15.33 सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले. या प्रकारात 14:58.71 सेकंद वेळ नोंदवत कझाकस्तानच्या नोरा जेरुतो तानुईने सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या युमा यामामोटोने 15:16.86 सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले. दरम्यान, पारुलचे या स्पर्धेतील दुसरे पदक ठरले.
अनिमेशने मोडला राष्ट्रीय विक्रम
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत अनिमेश कुजूरने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडत कांस्य पदक जिंकले आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच भारताला 200 मीटर प्रकारात पदक मिळालं आहे. यापूर्वी 2015 मध्ये धर्मवीर सिंगने भारतासाठी पदक जिंकले होते. या प्रकारात जपानच्या तोवा युझावाने 20.12 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक तर सौदी अरेबियाच्या अताफीने 20.31 सेकंद वेळेसह रौप्य पदक जिंकले.
विथ्या रामराजला कांस्य
महिलांच्या 400 मीटर हर्डल प्रकारात भारताच्या विथ्या रामराजने 56.46 सेंकद वेळ नोंदवत कांस्य पदकावर नाव कोरले. या प्रकारात चीनच्या मो जियाडिएने 55.31 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर बहरेन ओलुवाकेमी मुजीदत अडेकोयाने 55.32 सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी विथ्या पाचवी भारतीय महिला खेळाडू आहे.
800 मी शर्यतीत पुजाला कांस्य
महिलांच्या 800 मीटर शर्यतीत भारताच्या पुजाने 2:01.89 सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. चीनच्या वू हाँगजिओने 2:00.08 सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण तर जपानच्या रिन कुबोने 2:00.42 सेकंद वेळेसह रौप्य पदक जिकंले. हे तिचे यंदाच्या स्पर्धेतील दुसरे पदकही आहे. पुजाने याआधी 1500 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते.
रिलेमध्ये भारतीय महिलांचे रौप्य यश
महिलांच्या 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत भारतीय संघाने रौप्य पदक जिंकण्याची किमया केली. भारतीय संघात श्राबणी नंदा, स्नेहा शनुवल्ली, अभिनय राजराजन आणि नित्य गांधे यांचा समावेश राहिला. भारतीय संघाने 43.86 सेकंदाची वेळ नोंदवत रिलेमध्ये यश
भालाफेकीत भारताला रौप्य, पाकला सुवर्ण
पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सचिन यादवने 85.16 मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकले. त्याची ही सर्वोत्तम कामगिरीही राहिली. याच स्पर्धेत भारताचा यश वीर सिंग मात्र पाचव्या क्रमांकावर राहिला. त्याने 82.57 मीटर लांब भाला फेकला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.40 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक तर जपानच्या युता साकियामाने 83.75 मीटरसह कांस्य पदक जिंकले. भारताचा अव्वल खेळाडू नीरज चोप्रा मात्र या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.
चीन अव्वल तर भारतीय संघाला दुसरे स्थान
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चीनने 19 सुवर्ण, 9 रौप्य व 4 कांस्यपदकासह एकूण 32 पदके जिंकत पहिले स्थान पटकावले. भारतीय संघाने 8 सुवर्णपदकासह 24 पदके मिळवत दुसरे स्थान मिळवले. जपानचा संघ 28 पदकासह तिसऱ्या, कझाकिस्तान संघ 6 पदकासह चौथ्या तर कतारचा संघ सहा पदकासह पाचव्या स्थानी राहिला.









