वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
येथे शनिवारी झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नवा इतिहास घडविला असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने पदकांचे शतक पार केले आहे. भारतीय पॅरा पथकाने 111 पदकांची लयलूट केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमुख क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचा पदके मिळवण्याचा हा विक्रम आहे.
शनिवारी या स्पर्धेची सांगता झाली. भारताने 29 सुवर्ण, 31 रौप्य आणि 51 कास्य अशी एकूण 111 पदके मिळवली. अलीकडेच हांगझाऊ येथे झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पथकाने 107 पदके मिळवली होती. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पदकांच्या तक्त्यात भारत पाचव्या स्थानावर राहिला आहे. नेहमीप्रमाणे चीनने 214 सुवर्ण, 167 रौप्य आणि 140 कास्य अशी एकूण 521 पदके मिळवत पहिले स्थान घेतले आहे. इराणने 44 सुवर्ण, 46 रौप्य, 41 कास्य अशी एकूण 131 पदकांची कमाई करत दुसरे स्थान, जपानने 42 सुवर्ण, 49 रौप्य, 59 कास्य अशी एकूण 150 पदके मिळवत तिसरे स्थान तर कोरियाने 30 सुवर्ण, 33 रौप्य आणि 40 कास्यपदकांसह एकूण 103 पदकांची कमाई करत चौथे स्थान पटकावले.
2010 साली चीनमध्ये पहिली पॅरा आशियाई स्पर्धा भरविण्यात आली होती. भारताने या स्पर्धेत केवळ 1 सुवर्णसह 14 पदकांची कमाई करत पदकतक्त्यात 15 वे स्थान मिळवले होते. त्यानंतर 2010 आणि 2018 साली झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत भारताने पदकतक्त्यात अनुक्रमे 15 वे आणि नववे स्थान मिळवले होते. 2010 च्या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदकांचे शतक ओलांडताना 101 पदके मिळवली होती. नुकत्याच झालेल्या हांगझाऊ येथील पॅरा आशियाई स्पर्धेत भारतीय पाक 110 ते 115 पदके मिळवील अशी अपेक्षा बाळगली जात होती. दरम्यान भारताने 111 हा शुभ आकडा पदकांचा मिळवत नवा चमत्कार घडवला अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी व्यक्त केली आहे.
या स्पर्धेत गेल्या गुरुवारी भारताने 72 पदके घेत 2018 साली जकार्ता येथे झालेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रम मागे टाकला होता. जकार्ता पॅरा आशिया स्पर्धेच्या तुलनेत भारताने यावेळी 39 पदके अधिक मिळवली. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णासह एकूण 21 पदकांची कमाई केली. बुद्धिबळ आणि तिरंदाजी या प्रकारात भारतीय खेळाडूंनी अनुक्रमे 8 आणि 7 पदके मिळवली. तसेच नेमबाजीत सहा पदकांची कमाई केली. शनिवारी शेवटच्या दिवशी भारताने चार सुवर्णासह एकूण 12 पदके मिळवली. बुद्धिबळ प्रकारात भारताने 7 पदके घेतली. अॅथलेटिक्स प्रकारात 4 तर नौकानयन प्रकारात एक पदक मिळवले. अॅथलेटिक्समध्ये भारताच्या नीरज यादवने पुरुषांच्या एफ-55 भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवताना 33.69 मी. ची. नोंद केली. या प्रकारात भारताच्या तेकचंदने कास्यपदक घेतले. पुरुषांच्या टी-47 400 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या दिलीप गवीतने सुवर्णपदक मिळवताना 49.48 सेकंदाचा अवधी घेतला. महिलांच्या 1500 मी. टी 20 प्रकारात भारताच्या पूजाने कास्यपदक मिळवले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय बुद्धिबळपटूंनी सर्वोत्तम कामगिरी करताना 2 सुवर्णसह सात पदकांची कमाई केली. पुरुषांच्या वैयक्तिक व्ही 1-बी 1 रॅपिड विभागात भारताने सर्व म्हणजे तिन्ही पदके मिळवली. सतीश दर्पनने सुवर्ण, प्रदानकुमार सौंदर्याने रौप्य तर अश्विनीभाई मक्वानाने कास्यपदक मिळवले. भारताच्या या तीन बुद्धिबळपटूंनी सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेसाठी भारताने 313 खेळाडूंचे पथक पाठवले होते तर या स्पर्धेतील 22 पैकी 17 क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी आपला सहभाग दर्शवला. या स्पर्धेमध्ये 43 देशांचे सुमारे 4000 खेळाडू सहभागी झाले होते.









