वृत्तसंस्था/ हंगेरी
हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या पॉलीक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल 2025 कुस्ती स्पर्धेत 23 वर्षांखालील आशियाई चॅम्पियन कुस्तीपटू सुमितने 60 किलो ग्रीको-रोमन प्रकारात रौप्य पदक पटकाविले तर या स्पर्धेत भारताने एकूण दहा पदके मिळविली.
भारतीय कुस्तीगीरचा युरोपियन चॅम्पियन अझरबैजानच्या निहात मम्मादलीने अंतिम फेरीत 5-1 असा पराभव केला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत 60 किलो वजनी गटात विश्वचषक विजेत्याविरुद्ध त्याने केलेल्या धाडसी कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या 10 वर पोहोचली होती. बुडापेस्ट कुस्ती रँकिंग मालिकेत भारतीय संघाने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली. अंतिम फेरीत पोहोचताना सुमितने प्रभावी लढा दिला. प्री-क्वार्टरफायनलमध्ये त्याने सादिक लालेववर 9-3 असा विजय मिळवला. त्याने आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत क्वार्टरफायनलमध्ये कोरिया प्रजासत्ताकच्या देहुम किमवर 7-4 आणि शेवटच्या चारमध्ये कझाकस्तानच्या गॅलिम काबदुनासारोव्हवर 10-1 असा दमदार विजय मिळवला.
दरम्यान, अनिल मोरने ग्रीको-रोमन 55 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या इख्तियोर बोटीरोव्हला 7-4 असे हरवून कांस्यपदक पटकविले. मे महिन्यात उलानबातार ओपनमध्ये याच प्रकारात या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले होते. मोरला सुरुवातीच्या टप्प्यात संघर्ष करावा लागला आणि मोहिमेची सुरुवात कठीण झाली. क्वार्टर फायनलमध्ये तो युरोपियन चॅम्पियन एमिन सेफरशेवकडून 6-1 असा पराभूत झाला. परंतु मोल्दोव्हाच्या आर्टिओम डेलेनूवर 7-0 असा विजय मिळवल्यानंतर रेपेचेजद्वारे पदकावर आपला ठसा उमटवला.
भारताचे इतर ग्रीको-रोमन कुस्तीगीर, नीरज (67 किलो) आणि नितेश (97 किलो) हे त्यांच्या संबंधित वजन वर्गात पात्रता मिळवू न शकल्याने रिकाम्या हाताने परतले. हंगेरीच्या रॉबर्ट फ्रिट्सचविरुद्ध पात्रता फेरीत 9-0 असा पराभव पत्करावा लागल्याने निशांत (77 किलो) बाहेर पडला. रेपेचेजमध्ये कोरिया प्रजासत्ताकच्या बोसोंग कांगकडून त्याला 4-0 असा पराभव पत्करावा लागला. बुडापेस्टमधील पॉलीक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल ही वर्षातील चौथी आणि शेवटची कुस्ती रँकिंग मालिका होती.
पोल्याक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल 2025 कुस्ती भारतीय पदक विजेते: अंतीम पंघल (महिला 53 किलो) सुवर्ण पदक, हर्षिता (महिला 72 किलो) सुवर्ण पदक, सुजीत कलकल (पुरुष 65 किलो) सुवर्ण पदक, नेहा सांगवान (महिला 57 किलो) रौप्य पदक, प्रिया मलिक (महिला 76 किलो) सुवर्ण, सुमित (ग्रीक रोमन 60 किलो) रौप्य पदक, निलम (महिला 60 किलो)कांस्य पदक, मनिषा (महिला 62 किलो) कांस्य पदक, राहूल (पुरुष 60 किलो) कांस्य पदक, अनिल मोर(पुरुष ग्रीक रोमन 55 किलो) कांस्य पदक.









