वृत्तसंस्था / बडोदा
यजमान भारत आणि विंडीज महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला येथे रविवारपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेतील रविवारच्या पहिल्यासामन्याला दुपारी 1.30 वाजता प्रारंभ होईल.
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने अलिकडेच विंडीजचा टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव केला. आता भारतीय संघ वनडे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौर आता पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. दुखापतीमुळे तिला टी-20 मालिकेतील दोन सामन्यांत खेळता आले नव्हते. उपकर्णधार स्मृती मानधनाला फलंदाजीचा सूर सापडला असल्याने तिच्याकडून या मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जाते. तेजल हसबनीस आणि देवोल यांच्या सहभागामुळे भारतीय संघाची मधली फळी अधिक मजबूत झाली आहे. मानधना, कौर, रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, दिप्ती शर्मा यांच्यावर फलंदाजींची तर तितास साधू, सईमा ठाकुर, रेणूकासिंग ठाकुर, दिप्ती शर्मा यांच्यावर गोलंदाजींची भिस्त राहिल.
विंडीज संघाची कर्णधार मॅथ्युज तसेच उपकर्णधार कॅम्पबेल, डॉटीन हे प्रमुख फलंदाज आहेत. विंडीजच्या या तीन फलंदाजांनी चालु वर्षीच्या क्रिकेट हंगामात वनडेमध्ये 45 धावांच्या सरासरीने 308 धावा नोंदविल्या आहेत. भारतीय फलंदाजी आणि विंडीजची गोलंदाजी यांच्यात खरी लढत या सामन्यात पहावयास मिळेल.









