मधल्या फळीतील प्रयोग फलदायी ठरण्याची गरज, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांना स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी
वृत्तसंस्था/ तारौबा
भारताची आज मंगळवारी वेस्ट इंडिजशी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गांठ पडणार असून 1-1 अशी स्थिती झालेली असल्याने मालिकेचे भवितव्य ठरविण्याकामी या सामन्याला निर्णायक स्वरुप आले आहे. या सामन्यात मधल्या फळीत संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना खेळविण्याचा प्रयोग फलदायी ठरण्याची भारताला आशा असेल. 2006 पासून वेस्ट इंडिजविऊद्ध एकही एकदिवसीय मालिका न गमावलेल्या भारताला बार्बाडोसमधील दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकाच वेळी विश्रांती देण्याच्या प्रकारामुळे पराभवाचा सामना करावा लागला.
शनिवारी सहा गडी राखून वेस्ट इंडिजने पराभव केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारत पुढील महिन्यात होणारा आशिया चषक आणि आगामी विश्वचषक स्पर्धा यांच्या दृष्टीने दूरगामी विचार करत असल्याचे म्हटले आहे. युवा खेळाडूंचा कसा प्रभाव पडू शकतो हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे आता आणखी एक सामना बाकी असला, तरी मालिका जिंकण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक बनलेले आहे. ‘आम्ही नेहमी दूरगामी विचार करू. या टप्प्यावर आशिया चषक आणि नंतर विश्वचषक स्पर्धा समोर असताना आम्हाला दूरचे चित्र पाहावे लागेल. कारण काही खेळाडूंना दुखापती झालेल्या आहेत. आम्ही प्रत्येक सामन्याबद्दल, प्रत्येक मालिकेबद्दल काळजी करू शकत नाही, जर आम्ही तसे केले, तर ती चूक होईल, असे द्रविडने ठामपणे सांगितले आहे.
50 षटकांच्या प्रकारात चांगला खेळ करण्यासाठी धडपडणाऱ्या सूर्यकुमार यादवची अपेक्षा दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून सामना जिंकून देण्याच्या दृष्टीने योगदान देण्याची असेल. सॅमसनसारख्या खेळाडूने भरपूर वेळा पुनरागमन केलेले आहे, परंतु तो छाप सोडू शकलेला नाही. अशा परिस्थितीत मालिकेच्या निर्णायक सामन्यातून त्याच्यासमोर एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे तो यावेळीही तिसऱ्य क्रमांकावर फलंदाजीस येण्याची शक्यता आहे. सलामीवीर इशान किशन कसोटी मालिकेपासून फलंदाजीत प्रभावी दिसलेला आहे, पण शुभमन गिलला आतापर्यंत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर मोठी कामगिरी करता आलेली नाही.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजीची सुरुवात करणारा हार्दिक पांड्या हळूहळू त्याच्यावरचा ताण वाढवत चालला आहे. फलंदाजीत मात्र तो क्षमतेनुरुप कामगिरी करू शकलेला नाही आणि वेस्ट इंडिजविऊद्धच्या पाच सामन्यांच्या ‘टी20’ मालिकेपूर्वी ही उणीव भरून काढण्याचा त्याचा प्रयत्न राहील. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज उमरान मलिकला मालिकेत आतापर्यंत बळी मिळालेला नसून त्याने आपली क्षमता सिद्ध करायची आहे. त्याचा वेग ही निश्चितपणे भक्कम बाजू आहे, परंतु त्याने कौशल्य आणि अचूकतेच्या आघाडीवर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ‘चायनामन’ टाकणारा कुलदीप यादव हा भारताचा उठून दिसलेला गोलंदाज आहे. त्याने चांगली कामगिरी केल्याने त्याचा चांगला मित्र यजुवेंद्र चहलला संघात जागा मिळू शकलेली नाही. चहल आता फक्त पुढील ‘टी20’ मालिकेत खेळताना दिसणार आहे.
वेस्ट इंडिजकडे गमावण्यासारखे फारसे काही नाही आणि यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरल्याने भारताविरुद्धची मालिका जिंकल्यास त्यांना हा विजय अत्यंत आवश्यक चालना देऊन जाईल. त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना बरेच सतावलेले आहे. डावखुरा फिरकीपटू गुडाकेश मोती याने चेंडू बऱ्यापैकी वळविलेला आहे, तर वेगवान गोलंदाज रोमॅरियो शेफर्डने आखूड टप्प्याच्या चेंडूंचा चांगला उपयोग केलेला आहे. ‘आम्ही पुन्हा भरपूर प्रयत्न करणार आहोत. नेहमी वृत्तीबद्दल बोलले जाते आणि आम्ही ती दाखवून दिलेली आहे. आम्ही त्याची पुनरावृत्ती करण्याची आणि फलंदाजी तसेच गोलंदाजीत अधिक सातत्य राखण्याची गरज आहे, असे कर्णधार शाई होप याने म्हटले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 63 धावा केल्याने त्याचाही आत्मविश्वास उंचावला आहे.
संघ : वेस्ट इंडिज-शाई होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अॅलिक अथानाझे, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशाने थॉमस.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेळ : संध्याकाळी 7 वा.









