वृत्तसंस्था/ नेपियर
हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पावसाचा अडथळा आलेली यजमान न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-0 अशी जिंकली. या मालिकेतील मंगळवारी झालेला शेवटचा सामना डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे टाय झाला. धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची मालिकावीर तर मोहम्मद सिराजची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
मंगळवारी या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्वबाद 160 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 9 षटकाअखेर 4 बाद 75 धावा जमविल्या असताना पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी डकवर्थ लेविस नियमाचा वापर केला आणि खेळ थांबला त्यावेळी या नियमाद्वारे भारतीय संघाची धावसंख्या 4 बाद 75 अशी असल्याने हा सामना बरोबरीत (टाय) झाल्याची घोषणा केली.

मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या भेदक गोलंदाजीने न्यूझीलंडच्या डावाचे चित्रच पालटले. न्यूझीलंडची 16 व्या षटकात स्थिती 2 बाद 130 अशी भक्कम होती पण त्यानंतर अर्शदीप सिंग आणि सिराज यांनी आपल्या अचूक आणि भेदक माऱयासमोर सामन्याचे चित्रच पालटले. यजमान न्यूझीलंडने आपले शेवटचे आठ गडी केवळ 30 धावात गमविले. न्यूझीलंडच्या डावामध्ये कॉन्वेने 49 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 59 तर फिलिप्सने 33 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 54 धावा जमविताना तिसऱया गडय़ासाठी 86 धावांची भागीदारी केली होती. मिचेलने 2 चौकारासह 10 धावा जमविल्या. चॅपमनने 2 चौकारासह 12 धावा केल्या. न्यूझीलंडच्या 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. त्यांच्या डावात 5 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. अर्शदीप सिंगने 37 धावात 4 तर मोहम्मद सिराजने 17 धावात 4 गडी बाद केले. हर्षल पटेलने एक बळी मिळविला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारताचे पहिले चार फलंदाज झटपट बाद झाले. सलामीचा इशान किशन मिल्नेच्या गोलंदाजीवर दुसऱया षटकात झेलबाद झाला. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारासह 10 धावा केल्या. पंतने 5 चेंडूत 2 चौकारासह 11 धावा जमविल्या. तिसऱया षटकात तो साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा जमविल्या पण सोधीने त्याला फिलिप्सकडे झेल देण्यास भाग पाडले. साऊदीने श्रेयस अय्यरला खाते उघडण्यापूर्वीच तंबूत धाडले. भारताची स्थिती 6.3 षटकात 4 बाद 60 अशी होती. हार्दिक पंडय़ाने दीपक हुडासमवेत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पावसाला प्रारंभ झाल्याने पंचांनी खेळ थांबविला त्यावेळी भारताने 9 षटकात 4 बाद 75 धावा जमविल्या होत्या. कर्णधार पंडय़ा 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 30 धावावर तर हुडा 9 धावावर नाबाद राहिले. न्यूझीलंडतर्फे साऊदीने 2 तर मिल्ने आणि सोधी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या मालिकेतील पहिला तर पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. भारताने ही मालिका अखेर 1-0 अशी जिंकली.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 19.4 षटकात सर्व 160 ( कॉन्वे 59, चॅपमन 12, फिलिप्स 54, मिचेल 10, अर्शदीप सिंग 4-37, मोहम्मद सिराज 4-17, हर्षल पटेल 1-28), भारत 9 षटकात 4 बाद 75 (इशान किशन 10, पंत 11, सूर्यकुमार यादव 13, अय्यर 0, हार्दिक पंडय़ा नाबाद 30, हुडा नाबाद 9, साऊदी 2-27, मिल्ने 1-23, सोधी 1-12).









