बेंगळूर :
बुधवारी येथील कंठीरेव्वा स्टेडियमवर सुरू झालेल्या 2023 च्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत सुनील छेत्रीच्या शानदार हॅट्ट्रीक गोलांच्या जोरावर यजमान भारताने दणकेबाज विजयी सलामी देताना पाकिस्तानचा 4-0 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील अ गटातील खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कुवेतने नेपाळचा 3-1 असा फडशा पाडला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अ गटातील सामना एकतर्फीच झाला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने आपल्या दर्जेदार आणि आक्रमक खेळाच्या जोरावर पाकवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. पहिल्या मिनिटांपासूनच भारतीय खेळाडूंनी पाकच्या बचाव फळीवर दडपण आणण्यात यश मिळविले. दहाव्या मिनिटाला सुनील छेत्रीने भारताचे खाते उघडले. सोळाव्या मिनिटांला संघाला मिळालेल्या पेनल्टीवर सुनील छेत्रीने आपला वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल केला. पाकला या सामन्यात बचावात्मक खेळावर शेवटपर्यंत भर द्यावा लागला. मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याने पंचांना हस्तक्षेप करावा लागला.
मध्यंतरानंतर पावसाचे आगमन झाले. पण खेळ थांबविण्यात आला नाही. 74 व्या मिनिटांला सुनील छेत्रीने संघांचा तिसरा गोल केला. छेत्रीने या सामन्यात 3 गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. 81 व्या मिनिटांला भारताचा चौथा आणि शेवटचा गोल उदांता सिंग कुमामने केला. सुनील छेत्रीने या सामन्यात 2 गोल पेनल्टीवर नोंदविले. भारताच्या आक्रमक खेळासमोर पाकला शेवटपर्यंत आपले खाते उघडता न आल्याने भारताने हा सामना 4-0 असा जिंकून विजयी सलामी दिली.
या स्पर्धेतील अ गटातील खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कुवेतने नेपाळचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. या सामन्यात 28 व्या मिनिटांला कुवेतचा पहिला गोल खलिद इब्राहिमने केला. 41 व्या मिनिटांला शबीर अल खलीलने कुवेतचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत कुवेतने नेपाळवर 2-0 अशी आघाडी घेतली होती. 65 व्या मिनिटांला मोहम्मद अबुल धामनने कुवेतचा तिसरा गोल केला. नेपाळतर्फे एकमेव गोल 68 व्या मिनिटांला अंजन बिस्ताने केला.









