पुणे / प्रतिनिधी :
पाश्चिमात्य देशांमध्ये भारताची प्रतिमा ‘वेगाने विकसित होणारा देश’ अशी बनली असून, लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे मत अमेरिकेतील माजी राजदूत नवतेज सरना यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये ते बोलत होते. सरना म्हणाले, भारताची प्रतिमा पाश्चिमात्य देशात ‘गरीब देश’ अशी होती. तेथील वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या कार्टूनमध्ये भारताची प्रतिमा दर्शविताना भिक्षेकरी, रस्त्यावर फिरणारे वन्यप्राणी आदीचा समावेश असायचा. आता मात्र, वेगाने विकसित होणारा देश, अशी भारताची प्रतिमा बनली आहे.
पंधरा वर्षांपूर्वी भारताचा अमेरिकेसोबत फार व्यापार होत नव्हता. मात्र, आता व्यापाराचा आकडा 20 बिलीयन डॉलरवर गेला आहे. भारताची प्रतिमा आता विस्तारली आहे. गेल्या 20 ते 22 वर्षात अनेक बदल झाले आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन यांच्या सरकारमध्ये भारतीय व्यक्तींना महत्त्वाच्या पदावर स्थान दिले आहे, असेही सरना यांनी नमूद केले.








