विश्व हिंदू काँग्रेस 2023 मध्ये संबोधन : जागतिक समुदाय भारताकडे आशेने पाहतोय
वृत्तसंस्था/ बँकॉक
सरसंघचालक मोहन भागवत यांनी थायलंडमध्ये आयोजित विश्व हिंदू काँग्रेस 2023 ला शुक्रवारी संबोधित केले आहे. विश्व हिंदू काँग्रेस 2023 चे आयोजन थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये 24-26 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. या संमेलनात 55 देशांमधील सुमारे 3 हजार प्रतिनिधींनी भाग घेतला. जगासमोर सध्या अनेक अडचणी असून याप्रकरणी भारतच मार्ग दाखवू शकतो असे सर्वांचे मानणे असल्याचे उद्गार सरसंघचालकांनी काढले आहेत.
सध्याचे जग अडखळत आहे, मागील 2 हजार वर्षांपासून मानवाने आनंद आणि शांतता मिळविण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत. भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही तसेच विविध धर्मांना आजमावून पाहिले आहे. भौतिक समृद्धी प्राप्त झाल्याचे मानले गेले तरीही संतुष्टता मिळाली नसल्याचे उद्गार भागवत यांनी काढले आहेत.
विशेषकरून कोरोनात्तर काळात जगाने पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत भारतच मार्ग दाखवेल या विचारात बहुतांश जणांचे एकमत आहे, कारण भारतात हीच परंपरा राहिली आहे. भारताने यापूर्वी देखील ही भूमिका पार पडली आहे. आमच्या समाज आणि आमच्या राष्ट्रांचा जन्म याच उद्देशासाठी असल्याचे सरसंघचालकांनी म्हटले आहे.
हिंदू परंपरांमध्ये काही मतभेद असले तरीही त्या धर्माचे चांगले उदाहरण सादर करतात. आम्ही सर्व ठिकाणी जातो, सर्वांची मने जोडण्याचा प्रयत्न करतो, काही लोक याकरता संमती दर्शवितात तर काही जण नकार देतात तरीही आम्ही सर्वांसोबत जोडले जातो असे भागवत यांनी म्हटले आहे.
आम्ही धर्म विजयावर विश्वास ठेवतो. याचर आमचा धर्म टिकलेला आहे. ही प्रक्रिया धर्म नियमावर आधारित आहे अणि याचेच फलित म्हणजे धर्म आमच्यासाठी कर्तव्य ठरते. आम्ही धन विजय आणि असुर विजयाचा देखील अनुभव घेतला आहे. धन विजयाचा अर्थ वस्तूंपासून मिळणाऱ्या आनंदाशी निगडित आहे, परंतु यात उद्देश चांगले नसतात, हे एकप्रकारे आत्मकेंद्रीत होण्यासारखे आहे. देशाने 250 वर्षांपर्यंत (इंग्रजांची राजवट) धन विजय पाहिला आहे. असुर विजय म्हणजे अन्य समुदायांसाठी आक्रमकतेचा भाव बाळगणे. मुघलांनी शेकडो वर्षे राज्य केल्याने आमच्या भूमीवर मोठा विध्वंस झाल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
काही महिन्यांपूर्वी विश्व मुस्लीम परिषदेचे महासचिव भारतात आले होते आणि त्यांनी स्वत:च्या भाषणात जगात शांतता अन् सौहार्द हवा असल्यास भारतासोबत जोडले जाणे आवश्यक असल्याचे नमूद पेले होते. याचमुळे हे आमचे कर्तव्य आहे. याचमुळे हिंदू समाज अस्तित्वात आला असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
संमेलनाची थीम
तिसऱ्या विश्व हिंदू काँग्रेस संमेलनाची थीम ‘जयस्य आयतनं धर्म:’ ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ ‘धर्म, विजयाचा आधार’ असा होतो. या संमेलनात जगातील विविध क्षेत्रांमध्ये हिंदूंसोबत होत असलेला भेदभाव, अत्याचार तसेच हिंसा रोखण्याच्या पद्धतींसोबत विविध क्षेत्रांमधील हिंदूंच्या कामगिरींवर विचारमंथन केले जाणार आहे. या संमेलनाचे आयोजन वर्ल्ड हिंदू फौंडेशनकडून केले जाते. प्रथम वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे आयोजन 2014 मध्ये दिल्लीत तर दुसऱ्या संमेलनाचे आयोजन 2018 मध्ये अमेरिकेच्या शिकागोमध्ये पार पडले होते.
राम मंदिरासंबंधी जगभरात प्रचार व्हावा
आम्ही अयोध्येतून प्रसाद मागविला आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराची प्रतिकृती बँकॉमध्ये तयार होत आहे. अयोध्येतून रामलल्लाच्या जन्मस्थळाचे छायाचित्र आणणार आहोत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी राम मंदिराचा जगभरात प्रचार व्हावा असे उद्गार वर्ल्ड हिंदू फौंडेशनचे प्रमुख स्वामी विज्ञानानंद यांनी काढले आहेत.









