लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : देशाला ‘विकसित भारत’ बनविण्याचा संकल्प
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना देशाला विकसित भारत बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत, मणिपूर हिंसाचार, शेतकरी, महिलावर्ग, शेजारी राष्ट्रांबद्दलचे धोरण यासह अनेक मुद्यांवर भाष्य केले. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक नवीन योजनांचा उल्लेख करत देशाच्या प्रगतीबद्दल परखडपणे भाष्य केले. यावषी पंतप्रधानांनी दोन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर काही नव्या योजनांचीही घोषणा केली. यामध्ये शेतीला हायटेक करण्यापासून महिलांना पुढे नेण्यापर्यंतचा समावेश आहे. आज देशातील तरूणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते. आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे आणि शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कोणापेक्षाही कमी नाही. देशात संधींची कमतरता नसून आपल्यातील कौशल्याचा लाभ उठवण्याची क्षमता देशवासियांमध्ये आहे. त्याच आधारावर बदलत्या जगाला आकार आणि आधार देण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. यासोबतच पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘हा एक नवा भारत आहे. आत्मविश्वासाने भरलेला भारत, एक भारत जो आपले संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्र्रम करत आहे. म्हणूनच हा भारत.. थांबत नाही, थकत नाही, दमत नाही आणि हा भारत कधीच हरत नाही’, असेही ते पुढे म्हणाले. कोरोना काळातील कामाचा उल्लेख करत कोरोना काळात जगाने भारताची ताकद पाहिली आहे. कोरोनानंतर जागतिक समीकरणे बदलली असताना भारताने संधीचा फायदा उठवल्याचा दाखला त्यांनी दिला.
भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असून 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. देशात अनेक ठिकाणी आज नैसर्गिक संकट आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात सर्व भारतीयांचे मोठे योगदान आहे. गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आहे. या घटनेचा प्रभाव पुढील 100 वर्षे असणार आहे. भारतात तरूणांची संख्या अधिक आहे. भारत स्टार्टअपमध्ये जगात सर्वोत्तम आहे. त्यामुळे आता आपल्याला थांबायचे नाही. आता द्विधा स्थितीत राहायचे नाही. पुढील कित्येक वर्षाची दिशा निश्चित होणार आहे. तंत्रज्ञानात भारतीयांचा जगात डंका आहे. देश प्रगतीच्या मर्गावर पुढे जात असल्यामुळेच आज भारताच्या स्वातंत्र्याचा जल्लोष जगभर केला जात असल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला.
मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या घटनेचाही भाषणात उल्लेख केला. मणिपूरसह देशाच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. माता-भगिनींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. अशा कठीण प्रसंगात संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून यापुढेही ते करत राहतील, असेही पंतप्रधान म्हणाले.
2 कोटी ‘लखपती दीदी’ बनवण्याचे स्वप्न
बँकांपासून ते अंगणवाड्यांपर्यंत असे एकही व्यासपीठ नाही की, ज्यामध्ये महिला योगदान देत नसतील. आता माझे स्वप्न गावांमध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवण्याचे आहे. त्यासाठी आम्ही एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचे आणि दुरूस्त करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण होईल आणि देशाचे कृषी तंत्रज्ञान क्षेत्र मजबूत होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
सलग दहाव्यांदा फडकावला तिरंगा,
1 तास 28 मिनिटे भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. त्यानंतर 1 तास 28 मिनिटे भाषण केले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनीच सर्वाधिक लांबीचे भाषण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात 13 तास 40 मिनिटे भाषण केले आहे. त्यामुळे त्यांनी भाषणाचा विक्रम मोडीत काढला आहे. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधानांनी राजस्थानी पगडी परिधान केली होती. राजस्थानी बांधणी प्रिंटसह पिवळा आणि लाल पचरंगी साफा किंवा पगडी परिधान केलेल्या पंतप्रधानांच्या लुकचा थेट संबंध राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकांशी जोडला जात आहे. पंतप्रधान मोदींनी राजस्थानी पगडी परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान प्रत्येक वेळी पगडी परिधान करतात. 2014 मध्ये देखील 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी मारवाडी साफा परिधान करून ध्वजारोहण केले होते.