नेज येथे सिद्धार्थ डोणे महाराज यांची भाकणूक : कर्नाटकाच्या राजकारणाला भगदाड पडेल : हजारो भाविकांची उपस्थिती
बेडकीहाळ : नेज येथील नागझरी परिसरातील चिकोडी-बेडकिहाळ मार्गावरील नूतन बांधकाम करण्यात आलेल्या संत बाळूमामा मंदिराचा वास्तूशांती व लोकार्पण सोहळा विविध स्वामीजी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी सुक्षेत्र आप्पाचीवाडी येथील जागृत दैवत हालसिद्धनाथांच्या दरबारातील मानाचे भाकणूककार सिद्धार्थ भगवान डोणे महाराज यांनी भाकणूक कथन केली. यावेळी त्यांनी, राजकीय, सामाजिक धार्मिक सांस्कृतिक, शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामान, अतिरेकी हल्ले, यासह अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले.
डोंगरा एवढं पाप, दोरी एवढ पुण्य राहिलय, माणसाचं आयुष बोटावर मोजाल, वांग्याच्या झाडावर माणूस चढल, राजकारणात डोकी फुटतील, देशात समान नागरी कायदा लागू होईल, रासायनिक खतांचा प्रादुर्भाव वाढेल, जगात टोळी युद्ध छेडेल, तिसरे महायुद्ध होणार हाय, जपून रहावा बाळांनो. भारत देश जगात राज्य करेल, निष्पाप लोक बळी जातील, देशात प्रेम प्रकरण वाढतील, कर्नाटकच्या राजकारणात मोठी उथलपालत होईल, निपाणीत अतिरेकी येतील, बॉम्बस्फोट घडतील, जाळपोळ, फायरिंग होईल, कर्नाटकातील चौथा भाग ओसाड पडेल, उसाच्या खांडीला दुधाचा दर येईल, राज्याच्या राजकारणाला कलाटणी लागेल, जन्मलेल्या बाळाच्या कपाळी चंद्र दिसेल,
हातातील भाकर खांद्यावर येईल, आंबाचा मोहर फुलून राहील, सोयाबीन पिकाला चांगले दिवस येतील, वैरणीसाठी लोक भांडतील, शेतकऱ्याला सोन्याचे दिवस दिसतील, ज्याच्या घरात धान्य तोच खरा शान म्हणून घेईल, चोऱ्या-माऱ्या वाढतील, दिवसा दरोडे पडतील, गाई म्हशीचा भाव गगनाला भिडेल, दुधाचे दर वाढत राहील, नदीकाठाची जमीन ओसाड पडतील, आठ वर्षाची मुलगी आई होईल, मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल, सत्याची बाजू धरा बाळांनो, कोयनेच्या काठावर नऊ लाख बांगड्या फुटतील, स्त्राrचा आदर करा, आई वडिलांना देव माना, जे कराल ते इथेच फेडाल, कोंबडीचा दर मेंढीला आणि मेंढीचा दर कोंबडीला येईल,
जगात दुष्काळ पडेल, पिंजऱ्यातील पोपट भाषण करेल, लाकडाची डोरली येईल, पावसाळ्याचा उन्हाळा आणि उन्हाळ्याचा पावसाळा होईल, कपातून पाणी विकत मिळेल, धर्माचा पार्ड वर राहील, पापाची पार्ड खाली राहील, यासह अनेक विषयांवर महाराजांनी भविष्यातील होणाऱ्या घटनांवर भाकणूक कथन केले. यावेळी हजारो भाविकांनी भाकणुकीसाठी बाळूमामाच्या मंदिरामध्ये आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी मंदिर कमिटीकडून सिद्धार्थ डोणे महाराज यांचा सत्कार करण्यात आला.









