क्रिकेट मालिकांवरील बंदी कायम : भारत सरकारची घोषणा,आशिया कपला हिरवा कंदील
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानमधील खेळांबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही आणि पाकिस्तानी संघालाही भारतात येऊ दिले जाणार नाही, असे भारत सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. तथापि, आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहु-राष्ट्रीय स्पर्धा स्वतंत्र मानल्या जातील. हे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केल्यास भारत यामध्ये सहभागी होऊ शकतो, असे क्रीडा मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
भारताच्या धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुनर्संचयित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु आशिया कप ही बहु-राष्ट्रीय स्पर्धा असल्याने टीम इंडिया त्यात खेळेल, असे गुरुवारी क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. या निर्णयानंतर आता भारत-पाकिस्तानमधील संघर्ष फक्त आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांसारख्या व्यासपीठांवरच पाहायला मिळतील. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान 14 सप्टेंबर रोजी आमने-सामने येतील. तर अंतिम सामना 29 सप्टेंबर रोजी होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील टी-20 स्वरुपाची ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. याचदरम्यान पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळू नयेत अशी मागणी होत असताना क्रीडा मंत्रालयाने यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार भारत कोणत्याही प्रकारे पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानने शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. भारतीय संघाने 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर टीम इंडियाने आशिया कपमध्ये भाग घेतला होता. त्यापूर्वी 2005-06 नंतर भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानला भेट दिलेली नाही. जरी पाकिस्तान आणि भारत यांच्यात लहान स्वरूपात सामने सतत खेळले जात असले तरी भारत आणि पाकिस्तानचे संघ कसोटीत एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. आता 2025 मध्ये ‘आशिया कप’मध्ये मात्र भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.









