अमेरिकेचे अर्थमंत्री बेसेंट यांची कबुली
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरभक्कम आयातशुल्क लादले आहे. परंतु भारतासेबत व्यापार करार होऊ शकतो, अशी अपेक्षा अमेरिकेला अद्याप आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी याचे संकेत दिले आहेत. व्यापार चर्चेसाठी भारताची भूमिका काहीशी ताठर स्वरुपाची असल्याचे त्यांनी मान्य केले. भारत कुठल्याही देशाच्या दबावाखाली येत निर्णय घेणारा देश नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने मान्य केले आहे.
अमेरिकेसोबत व्यापार चर्चेत भारत ताठर भूमिका बाळगून असल्याचे बेसेंट यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याचे कारण पुढे करत भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क लादले होते. अशाप्रकारे अमेरिकेने भारतावर 50 टक्के शुल्क लागू केले आहे. अतिरिक्त 25 टक्के शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
स्वीत्झर्लंड आणि भारतासह काही देशांसाब्sात व्यापार करार अद्याप होणार आहेत किंवा त्याबद्दल सहमती झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत शुल्कविषयक चर्चा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. स्वीत्झर्लंडसोबत चर्चा सुरू आहे. आम्ही सर्व मोठ्या देशांसोबत व्यापार कराराच्या अटींवर सहमत झालो आहोत असे वाटते. आम्ही चांगल्या स्थितीत आहोत असे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले .
कृषी अन् डेअरी क्षेत्र
अमेरिका व्यापार कराराच्या अंतर्गत भारताचे डेअरी अन् कृषी क्षेत्र खुले करण्याची मागणी करत आहे, तर भारत यासाठी तयार नाही. देशात कोट्यावधी अल्पभूधारक शेतकरी असून ते अमेरिकेच्या कृषी क्षेत्राचा व्यापाराप्रकरणी सामना करू शकत नाहीत. कृषी क्षेत्र खुले केल्यास शेतकरी आणि पशूपालकांची उपजीविका संकटात सापडू शकते.









