मात्र ‘आयपीएल’मधून झालेली तयारी हलक्याने न घेण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंडमधील परिस्थितीचा विचार करता ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची ताकद पुढील महिन्यात होणाऱ्या भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांचे पारडे थोडे जड बनवून जाईल, तर भारतावर दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीचा वाईट परिणाम होऊ शकतो, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.
अष्टपैलू हार्दिक पांड्याची काहीशी आश्चर्यकारक अनुपलब्धता देखील भारताला हानी पोहोचवू शकते, असे चॅपेल यांनी ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’साठीच्या एका स्तंभात लिहिले आहे. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल हे आणखी दोन भारतीय खेळाडू आहेत जे दुखापतींमुळे 7 ते 11 जून दरम्यान होणार असलेल्या अंतिम सामन्यातून बाहेर पडले आहेत.

बहुतेक भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये दोन महिने खेळल्यांनंतर अंतिम सामन्यात उतरणार आहे. परंतु चॅपेल यांच्या मते, त्याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही. सदर अंतिम सामन्याविषयी अंदाज लावणे कठीण आहे. कारण मुख्यत्वे दुखापतींविषयीच्या चिंता हे आहे. शिवाय या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या चुरशीच्या मालिकेनंतर कोणताही संघ कसोटी खेळलेला नाही. त्यातच सहभागी होणारे अनेक खेळाडू या एकमेव कसोटीच्या पूर्वी केवळ आयपीएलमध्ये खेळलेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
ही आदर्श तयारी वाटत नसली, तरी इंग्लंडचा माजी फलंदाज रवी बोपाराचे उदाहरण यासंदर्भात आठवण्यासारखे आहे. 2009 मध्ये बोपाराने आयपीएलमधून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रवेश केला आणि ‘टी20’मुळे त्याची तयारी चांगली झाल्याचे तसेच त्यामुळे तो सकारात्मक मानसिकतेत राहिल्याचे मानले गेले’, असे चॅपेल यांनी कॅरिबियनमध्ये बोपाराने त्यावेळी नोंदविलेल्या सलग शतकांचा संदर्भ देत सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा भारतापेक्षा चांगला आहे, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा फिरकी विभागात वरचष्मा राहील. तथापि, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांचा समावेश असलेला भारतीय वेगवान मारा देखील मजबूत आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने म्हटले आहे.









