माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदला आत्मविश्वास
कोलकाता / वृत्तसंस्था
भारतात बुद्धिबळात प्रचंड गुणवत्ता असून लवकरच आपल्याला नवा बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन भारतातून मिळेल. मात्र, यासाठी कोणताही शॉर्टकट नसल्याने आणि हे घडवण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने 2025 पर्यंत यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे प्रतिपादन विश्वनाथन आनंदने केले. आनंदने वेस्टब्रिज आनंद चेस अकादमीच्या माध्यमातून चेस व्हिझकिड्सची नवी बॅच सुरु केली. त्यानंतर तो बोलत होता.
भारतात सध्या 6 जनरेशन-नेक्स्ट टॅलेंट्स म्हणून निहाल सरिन, आर. प्रज्ञानंद, रौनक साधवानी, डी. गुकेश, आर. वैशाली व अर्जुन इरिगेसी आघाडीवर राहिले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये वेस्टब्रिज आनंद चेस अकादमीत त्यांचा समावेश करण्यात आला. आर. प्रज्ञानंदचे प्रशिक्षक मात्र आरबी रमेश आहेत.
‘आपण 2025 पर्यंत भारताचा नवा वर्ल्ड चॅम्पियन घडवू शकतो. पण, त्यापूर्वी असे होणे आव्हानात्मक आहे’, असे आनंदने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. यंदा मॅग्नस कार्लसनने आपण जेतेपद कायम राखण्यासाठी लढणार नाही, असे जाहीर केले असून यामुळे 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिप कँडिडेट्स स्पर्धेतील पहिले दोन ग्रँडमास्टर वर्ल्ड चॅम्पियनशिप जेतेपदासाठी आमनेसामने भिडतील आणि त्यातून नवा वर्ल्ड चॅम्पियन लाभेल. तूर्तास, गुकेश व प्रज्ञानंद प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जातात.
आनंदने यादरम्यान भारताला नवा बुद्धिबळ जगज्जेता मिळवून देण्याऐवजी असे जगज्जेतेपद मिळवणाऱया बुद्धिबळपटूंची नवी फळी तयार करण्यावर आपला भर असेल, असे स्पष्ट केले आहे.
चेस ऑलिम्पियाडमधील लक्षवेधी यश
भारताने चेन्नईत संपन्न झालेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये 9 पदके जिंकली आणि त्यात महिला संघाने पहिलेवहिले कांस्य जिंकण्याचा पराक्रम गाजवला. गुकेश, निहाल, प्रज्ञानंद व रौनक यांचा समावेश असलेल्या भारत ब संघाने खुल्या गटात कांस्य जिंकले आणि हा निव्वळ योगायोग अजिबात नाही, असे आनंदने म्हटले आहे.
‘मागील तीन वर्षे अतिशय कठीण, आव्हानात्मक होते. पण, आपल्या सुदैवाने आमच्या युवा खेळाडूंनी हा कालावधी अजिबात वाया जाऊ दिलेला नाही. चेस ऑलिम्पियाडच्या माध्यमातून भारताने आपण भविष्यातील सुपरपॉवर आहोत, याचा दाखला दिला असून अद्याप त्यात बरीच सुधारणा करता येईल. स्मार्ट वॉचेसच्या माध्यमातून फिटनेस वाढवणे, सायकॉलॉजिकल ट्रेनिंग याची आवश्यकता वाढत चालली आहे’, असे निरीक्षण त्याने पुढे नोंदवले.
‘कोरोनामुळे जगरहाटी ठप्प झाली, त्यावेळी ऑनलाईन चेस मोठय़ा प्रमाणात सुरु होते आणि रेटिंग वाढवण्यासाठी आम्ही त्यावर भर दिला होता. त्यावेळी, प्रज्ञानंद, निहाल यांचे एलो रेटिंग 2600 च्या आसपास तर अर्जुन, गुकेश यांचे रेटिंग 2500 च्या आसपास होते. स्पर्धा होत जातील, त्याप्रमाणे रेटिंग सुधारण्यावर भर दिला आणि त्यामुळे आता गुकेश, अर्जुन यांचे रेटिंग 2700 पेक्षा पुढे आहे तर आर. प्रज्ञानंदने कार्लसनला तब्बल पाचवेळा नमवले, हा मोठा पराक्रम आहे. तो उत्तम खेळत आहे आणि लवकरच 2700 रेटिंगच्या आसपास पोहोचू शकेल’, असे आनंदने याप्रसंगी सांगितले. व्यावसायिक बुद्धिबळापासून दूर जाऊ नये, यासाठी आपण स्वतः वर्षातून किमान एक-दोन स्पर्धा खेळणार असल्याचे त्याने शेवटी नमूद केले.









