शतकाच्या अखेरपर्यंत 47 कोटींनी कमी होणार लोकसंख्या
@ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील बहुतांश देशांमध्ये लोकसंख्या वृद्धीचा वेग 2035 पर्यंत कमी होऊ लागणार आहे. बहुतांश देशांमध्ये प्रजनन दर रिप्लेसमेंट लेव्हलच्या खाली आहे. भारतात 2050 पर्यंत लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या वाढणार आहे. तर शतकाच्या अखेरपर्यंत लोकसंख्येत मोठी घट होणार आहे. युएन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉसेक्ट्स अहवालात ही बाब नमूद आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनुमानानुसार 2054 च्या आसपास जगाची लोकसंख्या उच्चांकावर असणार आहे. त्यावेळी जगाची लोकसंख्या 8.9 अब्जापर्यंत पोहोचणार आहे. परंतु लोकसंख्येचा उच्चांक 2054 पूर्वी देखील येऊ शकतो असेही अनेक तज्ञांचे मानणे आहे. परंतु या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होणार आहे.
सध्या युवा आहे भारत
भारत सध्या एक तरुण देश आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत निम्म्याहून अधिक लोकांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. देशात 2020 मध्ये 10-14 वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक होती. 2050 नजीक येताच भारताची लोकसंख्या वृद्ध होऊ लागणार आहे. लोकसंख्येत 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांची संख्या सर्वाधिक असणार आहे. तोपर्यंत भारतात 40-44 वयोगटातील लोक सर्वाधिक संख्येत असतील. चालू शतकाच्या अखेरपर्यंत भारताची एकूण लोकसंख्या सध्याच्या तुलनेत एक तृतीयांशने कमी होणार आहे. त्यावेळी देशात सर्वाधिक संख्या 60-64 वयोगटातील लोकांची असणार आहे.
34 टक्क्यांनी असणार कमी
चालू शतकाच्या अखेरपर्यंत भारत, चीन आणि काही देशांच्या लोकसंख्येत नाटय़मय घसरण दिसून येईल. 2100 पर्यंत जपानच्या लोकसंख्येत सर्वाधिक 60 टक्क्यांची घसरण होईल. चीनच्या लोकसंख्येतही 50 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण होईल. तर 2100 पर्यंत भारताची लोकसंख्या 34 टक्क्यांनी कमी असणार ओ. संयुक्त राष्ट्रसंघानुसार 2020 मध्ये भारताची लोकसंख्या 138 कोटी होती. 2100 मध्ये हे प्रमाण कमी होत 91 कोटींवर येणार आहे.
…परंतु वय वाढणार
शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक लोकसंख्या कमी होणार असली तरीही लोक अधिक काळ जगतील. 2100 पर्यंत आयुर्मान 80 वर्षांपेक्षा अधिक असणार आहे. सध्या जागतिक आयुर्मान 73 वर्षे आहे, 2100 पर्यंत हे वाढून 81.7 वर्षे होणार आहे. याचा अर्थ शतकाच्या अखेरपर्यंत लोक निवृत्तीनंतर आणखीन 20 वर्षे जगतील. यामुळे निवृत्तीचे वय अधिक करण्याची वेळ शासनावर येऊ शकते.
पाकिस्तानात वाढतच राहणार
शतकाच्या अखेरपर्यंत प्रत्येक देशातील लोकसंख्या कमी होणार नाही. काही देशांमध्ये लोकसंख्या वाढणार आहे. टांझानियाची लोकसंख्या आताच्या तुलनेत सुमारे अडीचपट असणार आहे. सध्या टांझानियाची लोकसंख्या 6 कोटी आहे, तर 2100 मध्ये त्याची लोकसंख्या 20.5 कोटी होणार आहे. 2100 पर्यंत कांगोची लोकसंख्या आताच्या तुलनेत सुमारे दुप्पट असणार आहे. पाकिस्तानची लोकसंख्या देखील 22 कोटींच्या तुलनेत वाढून 26 कोटी होणार आहे. नायजेरियाची लोकसंख्या 21 कोटींवरून वाढत 53 कोटीपर्यंत पोहोचणार आहे.
लोकसंख्या अन् भविष्यातील अनुमान
देश 2020 2100 बदल
चीन 143 68 -52
भारत 138 91 -34
अमेरिका 33 30 -7.2
इंडोनेशिया 27 20 -24.9
ब्राझील 21 11 -46.2
बांगलादेश 16 8.9 -46.2
रशिया 14 8.4 -42.6
मेक्सिको 12 8.9 -30.6
फिलिपाईन्स 11 9.5 -13.6