इराक व संयुक्त अरब अमिरात यांच्याशी बोलणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत सध्याला रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल अर्थात ब्रेंट क्रूड मागवत आहे. यासोबत आता भारत इराक व संयुक्त अरब अमिरात यांच्याशी बोलणी करुन सवलतीत कच्चे तेल मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते.
देशाला सर्वात जास्त तेल पुरवणाऱ्या इराकच्या अधिकाऱ्यांकडून लवकरच भारतीय अधिकाऱ्यांसोबत सवलतीसाठी बोलणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. मधल्या काळात रशियाकडून सवलतीत तेल मागवण्यात येत असल्याने भारताने पश्चिमी देशांवरचे कच्च्या तेलावरचं अवलंबित्त्व कमी केले होते. पण आता इराक व संयुक्त अरब अमिरात यांच्याकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर सवलत दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातूनच आगामी काळात भारताला स्वस्तात कच्चे तेल उभय देशांकडून मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
रशियाकडून एप्रिलपासून पुरवठा
रशियातून कच्च्या तेलाची आवक भारतात एप्रिलपासून सर्वाधिक राहिली आहे. रशियातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाची विक्री भारतात दुबईतील बेंचमार्कनुसार झाली असून 8 ते 10 डॉलर प्रति बॅरल सवलत तेल खरेदीवर भारताला मिळाली आहे. भारतातील तेल कंपन्यांना यापेक्षा कमी किमतीला कच्चे तेल खरेदी करायचे आहे.









