महिला ‘टी20’ विश्वचषक स्पर्धा
वृत्तसंस्था/ केपटाऊन
महिला ‘टी20’ विश्वचषकाचे जेतेपद मिळवू पाहणारा भारत आज रविवारी सलामीच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा मुकाबला करणार आहे. भारत-पाक सामना नेहमीच उत्कंठा निर्माण करतो. परंतु भारतीय संघ आता खूप उच्च दर्जाचा बनल्याने ही लढत चुरसपूर्ण ठरण्याची अपेक्षा पूर्ण करू शकेलच असे नाही. पाकिस्तानने गेल्या वषी आशिया चषक स्पर्धेतील त्यांच्या शेवटच्या सामन्यात भारताला धक्का दिला असला, तरी गेल्या पाच वर्षांत दोन्ही संघांमधील अंतर खूप वाढले आहे.

पहिल्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावाच्या एक दिवस अगोदर हा खेळ सामना होणार असल्याने भारतीय खेळाडूंना आणखी प्रेरणा मिळू शकेल. भारताला सलामीच्या सामन्यापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौर (खांदा) आणि स्मृती मानधना (बोट) यांच्या तंदुरुस्तीबद्दल चिंता आहे. शनिवारी सराव सत्रानंतर त्यांच्या सहभागावर निर्णय घेतला जाईल. त्या दोघीही वरिष्ठ खेळाडू आहेत आणि संघासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या तयारीबद्दल थोडी जरी शंका असली, तरी आम्ही त्यांना खेळविण्याचा धोका पत्करणार नाही. कारण हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
विश्वचषकापूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभव पत्करावा लागला. सराव सामन्यांत बांगलादेशला पराभूत करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. भारतातर्फे रेणुका सिंग वगळता गोलंदाजी फारशी आत्मविश्वास निर्माण करणारी नसून अनुभवी शिखा पांडेने गेल्या महिन्यात पुनरागमन केल्यापासून अद्याप एकही बळी घेतलेला नाही. फिरकीपटूंची कामगिरीही अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे.
फलंदाजीत हरमनप्रीत आणि मानधना यांना सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळविलेल्या भारताचे नेतृत्व केलेली शेफाली वर्मा सातत्यपूर्ण प्रदर्शनासह तिच्याबद्दलच्या शंकांना चुकीचे सिद्ध करण्यास उत्सुक असेल. जेमिमा रॉड्रिग्सवरही चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल कारण ती तिच्या पुनरागमनानंतर प्रभावी खेळी खेळू शकली नाही. अष्टपैलू पूजा वस्त्रकारची भूमिकाही भारतासाठी महत्त्वपूर्ण असेल. त्याशिवाय रिचा घोषच्या फटकेबाजीवरही खूप काही अवलंबून असेल.
संघ-भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकुर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.
सामन्याची वेळ – 6.30 वा.









