‘फिफा’ क्रमवारीतील अव्वल 100 स्थानांमध्ये पोहोचण्याचे ध्येय
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेतील आज गुरुवारी होणार असलेल्या शेवटच्या साखळी लढतीत भारताचा सामना त्यांच्याहून वरच्या स्थानावर असलेल्या लेबनॉनशी होणार आहे. यावेळी फिफा क्रमवारीतील अव्वल 100 स्थानांमध्ये प्रवेश करण्याचा उद्देश बाळगून यजमान संघ खेळेल. दुसऱ्या विजेतेपदाचा पाठपुरावा करताना भारतीय संघाने मंगोलिया आणि वानुआतूवर विजय मिळवून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
इगोर स्टिमॅक यांच्याकडून प्रशिक्षित भारतीय संघासाठी रविवारच्या शिखर लढतीची तयारी करण्याच्या दृष्टीने आजचा सामना उपयोगी पडेल. त्याशिवाय भारताच्या दृष्टीने या सामन्याला वेगळे महत्त्व लाभलेले आहे. लेबनॉन सध्या 99 व्या आणि भारतीय संघ 101 व्या स्थानावर आहे. भारताचा विजय झाल्यास ते पुन्हा आघाडीच्या 100 संघांच्या यादीमध्ये प्रवेश करतील. योगायोगाची गोष्ट म्हणजे भारताने इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेच्या शुभारंभी वर्षी म्हणजे 2018 साली विजेतेपद मिळविले होते तेव्हाही त्यांनी आघाडीच्या 100 संघांत पोहोचण्यात यश मिळविले होते. बाईचुंग भूतिया आणि विजयन यांच्या सुवर्णकाळात फेब्रुवारी, 1996 मध्ये भारताने 94 वे स्थान प्राप्त केले होते. ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे.
मंगोलियाला पराभूत करण्यात अपयशी ठरल्यानंतर लेबनॉनसाठी आता जिंकू किंवा मरू धर्तीची परिस्थिती झाली आहे. आजचा सामना बरोबरीत सुटल्यास अलेक्झांडर इलिकच्या संघाला अंतिम फेरीत यजमानांविऊद्ध पुन्हा लढण्याच्या दृष्टीने ते पुरेसे ठरेल. पुरेसा असेल. परंतु त्यासाठी आधीच्या सामन्यात मंगोलियाने वानुआतूला पराभूत करणे आवश्यक आहे. जर लेबनॉनचा संघ हरला, तर मात्र गोलफरकाच्या आधारे अंतिम फेरीत पोहोचणारा संघ ठरेल.
आम्ही घरच्या मैदानावर खेळत आहोत. शिवाय आम्ही प्रत्येक सामन्यात फक्त जिंकण्याच्या उद्देशाने उतरत आहोत. लेबनॉनने त्यांच्या मागील सामन्यात कशी कामगिरी केली याने काहीही फरक पडत नाही. सायंकाळी चार वाजता दोन सामने खेळणे त्यांना कठीण गेलेले आहे. असे असले, तरी आमच्यासाठी हा सामना कठीण असणार आहे. कारण त्यांच्या काही खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. अर्थात त्यांच्यातही काही कमकुवत दुवे आहेत, असे प्रशिक्षक स्टिमॅक यांनी म्हटले आहे. भारताने या स्पर्धेत अद्याप एकही गोल स्वीकालेला नाही, परंतु त्यांना गोल करण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागला आहे.









