संरक्षण विभागाकडून प्रकल्प संमत, त्वरितच होणार कामाला प्रारंभ, स्वयंपूर्ण संरक्षण सिद्धतेचे धोरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या संरक्षण विभागाने महत्वाकांक्षी पाचव्या पिढीतील युद्धविमान स्वदेशातच बनविण्याच्या प्रकल्पाला संमती दिली आहे. हे विमान अॅडव्हान्सड् मिडियम काँबेट एअरक्राफ्ट (एएम्ससीए) या श्रेणीतील असेल. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी या प्रकल्पाला संमती दिल्याने त्यावर वेगाने काम केले जाणार आहे, अशी माहिती संरक्षण विभागाकडून मंगळवारी देण्यात आली आहे.
संरक्षण सामग्रीची निर्मिती अधिकाधिक प्रमाणात देशातच करण्याचे भारताचे धोरण आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये या स्वदेशी शस्त्रास्त्र उत्पादनात देशाने मोठी प्रगती साधली आहे. या प्रगतीचे प्रत्यंतर नुकतेच सिंदूर अभियानात आले आहे. त्यामुळे भारताचा उत्साह वधारला असून आता अधिक मोठ्या युद्ध साधनांची निर्मिती देशातच करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून ही 5 व्या पिढीतील युद्ध विमानाची स्वदेशी निर्मिती केली जाणार आहे.
विमानाची वैशिष्ट्यो
हे विमान 25 टन वजनाचे आणि दोन इंजिनांचे असेल. ते शत्रूच्या रडावर दिसणार नाही, अशा प्रकारचे ‘स्टील्थ’ विमान असेल. ते भारताच्या अत्याधुनिक विमानाच्या सर्व आवश्यकता पूर्ण करणारे असेल, याची दक्षता घेण्यात येणार आहे. या विमानात क्षेपणास्त्रे, गन्स, बाँबस् आणि इतर अनेक प्रकारचा शस्त्रसंभार असेल. जगातील अशा प्रकारच्या कोणत्याही विमानाच्या तुल्यबळ किंवा त्याहीपेक्षा सरस अशा प्रकारचे बनविण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.
15 हजार कोटींचा प्रकल्प
या प्रकल्पासाठी प्रारंभीची तरतूद 15 हजार कोटी रुपयांची असेल. या विमानात अत्याधुनिक इलेक्टॉनिक यंत्रणा बसविण्यात येणार असून ती कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान आधारित असेल. एकावेळी चार दूरच्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे या विमानातून डागता येतील. तसेच अनेक प्रिसिजन गायडेड, सेल्फ गायडेड आणि इतर प्रकारचे बाँब या विमानातून डागता येणार आहेत. हा प्रकल्प हाती घेतल्याने भारत आता जगातील पाच निवडक देशांच्या रांगेत जाऊन बसणार आहे. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन असे हे पाच देश आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
तेजसहून भिन्न विमान
हे मिडियम काँबॅट विमान भारत निर्मित तेजस या हलक्या युद्ध विमानापेक्षा भिन्न आहे. हे विमान तेजसचीच सुधारित आवृत्ती म्हणून ओळखले जाणार नाही. या विमानावरुन एकावेळी 1 हजार 500 किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेता येणार आहेत. ते अमेरिकेचे एफ 35, चीनचे जे 20 किंवा रशियाच्या एसयु 57 या विमानांच्या तोडीस तोड असेल्। असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
केव्हा मिळणार हे विमान…
सर्वात महत्वाचा प्रश्न या विमानाच्या उत्पादनाला केव्हा प्रारंभ होणार हा आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) म्हणण्यानुसार हा प्रकल्प तडीस जाण्यास आजपासून 10 वर्षे लागणार आहेत. भारताने अशा प्रकारचे विमान निर्माण करण्याची योजना गेल्याच वर्षी हाती घेतली आहे. त्यामुळे एवढा वेळ त्यासाठी लागणे हे स्वाभाविक आहे. या संस्थेचे प्रमुख समीर व्ही. कामत यांनी यापूर्वीच हा कालावधी स्पष्ट केला आहे. मात्र, 10 वर्षांहून अधिक काळ लागणार नाही, हे सुनिश्चित केले जाईल, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे.
स्वप्न साकार होणार…
स्वदेशनिर्मित विमानाचे स्वप्न भारताने गेल्या चार दशकांपासून पाहिले आहे. राजीव गांधी यांच्या काळात याचा प्रारंभ झाला होता. तथापि, पुढची तीन दशके यावर वेगाने काम झाले नाही. अनेक कारणांच्यामुळे हा प्रकल्प रखडला. धोरण सातत्य नसणे आणि लालफीतशाही यांचा मोठा फटका या प्रकल्पाला बसला. गेल्या 10 वर्षांमध्येच स्वदेशीला खऱ्या अर्थाने मोठे बळ मिळाल्याने याही प्रकल्पाला वेग आला आहे. म्हणून येत्या 10 वर्षांमध्ये हे ध्येय साध्य होण्याची शक्यता आहे.
स्वदेशनिर्मित विमान 10 वर्षांमध्ये…
ड पाचव्या पिढीतील स्वदेशनिर्मित युद्धविमान 10 वर्षांमध्ये निर्मिले जाणार
ड जगातील कोणत्याही अत्याधुनिक स्टील्थ विमानाच्या तोडीस तोड असेल
ड विमानावर अत्याधुनिक शस्त्रसंभार, क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा









