जागतिक वाढीमध्ये 18 टक्क्यांचा वाटा राहणार : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भाकीत
वृत्तसंस्था / मुंबई
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याने येत्या पाच वर्षांत जागतिक विकासात भारताचे योगदान वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आयएमएफ आशिया आणि पॅसिफिक विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले की, 2028 पर्यंत जगाच्या विकास दरात भारताचा वाटा 18 टक्के असेल, जो सध्या 16 टक्के असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवीनतम आयएमएफ डाटा दर्शवितो की चीनच्या आर्थिक मंदीच्या तुलनेत भारताच्या वेगवान वाढीमुळे दक्षिण आशियाई देश त्याच्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जागतिक वाढीमध्ये मोठा वाटा उचलू शकतो. तथापि, त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत, चीनचे वर्चस्व कायम आहे. आयएमएफच्या ताज्या अंदाजांवर आधारित, चीनचा नाममात्र जीडीपी 2028 पर्यंत 23.61 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल, तर भारताचा 5.94 ट्रिलियन डॉलर होणार असल्याचेही यावेळी म्हटले आहे.
आयएमएफ डेटा दर्शविते की 2023 आणि 2024 मध्ये चीन आणि भारत संयुक्तपणे जागतिक वाढीमध्ये निम्मे योगदान देतील. भारत जागतिक अर्थव्यवस्थेतील चीनच्या योगदानाशी बरोबरी करत नाही. भारताची अर्थव्यवस्था या वर्षी आणि पुढच्या काळात 6.3 टक्के वाढेल असा आयएमएफचा अंदाज आहे. आशिया पॅसिफिक या वर्षी 4.6 टक्के वाढीसह सर्वात गतीमान राहण्याची अपेक्षा आहे.









