ख्यातनाम विचारवंत दीपक करंजीकर यांचे प्रतिपादन : उद्बोधक व्याख्यानात सध्याच्या जागतिक राजकारणाचा घेतला आढावा
बेळगाव : जागतिक राजकारणाच्या बुद्धिबळ पटावर एकविसाव्या शतकात भारत अत्याधिक महत्त्वाचा मोहरा ठरणार आहे. भारताच्या सामर्थ्याचा प्रत्यय जगाला त्याने पाकिस्तान विरोधात यशस्वी केलेल्या ‘सिंदूर अभियाना’तून आलेला आहे. त्यामुळे भारताला एकटे पाडण्याचे प्रयत्नही स्वत:ला महाशक्ती मानणाऱ्या देशांकडून केले जात आहेत. परिणामी काही आव्हाने भारतासमोर उभी ठाकली आहेत. ती निर्धारपूर्वक आणि ठामपणे पेलल्यास भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम विचारवंत, कॉर्पोरेट जगतातील कुशल आणि अनुभवी तज्ञ, तसेच प्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर यांनी केले आहे.
ते गुरुवारी येथील आयएमईआरच्या सभागृहात ‘इनरव्हील’ क्लबच्यावतीने आयोजित ‘जागतिक राजकारण आणि सद्यस्थिती’ (जिओ पॉलिटिक्स अॅण्ड करंट अफेयर्स) या विषयावर व्याख्यान देत होते. जागतिक राजकारणाचा गेल्या काही शतकांमधील इतिहास स्पष्ट करत, त्या आधारावर त्यांनी 21 व्या शतकातील जागतिक राजकारणाचे कंगोरे आणि भारताचे त्यातील स्थान यांच्यावर उद्बोधक विवेचन केले. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी युरोपातील तंत्रवैज्ञानिक क्रांती, तिच्या आधारावर त्या लोकांनी जगावर गाजवलेले अधिराज्य आणि त्या माध्यमातून जगाचे, विशेषत: भारताचे केलेले आर्थिक शोषण आणि त्याचे झालेले परिणाम यांची माहिती दिली. स्पेन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांनी इतर खंडांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करून कशा प्रकारे आर्थिक उत्पात घडविला आणि हे खंड कसे देशोधडीला लागले, यासंबंधी त्यांनी प्रभावी भाषेत उपस्थित श्रोत्यांना आकडेवारीसह माहिती दिली.
भारतीय संस्कृती ठरली भारी
जगातील विविध संस्कृतींच्या लोकांनी भारतावर आक्रमणे केली. युरोपिय संस्कृतीचेही भारतावर अतिक्रमण झाले. ब्रिटिशांनी भारताची एकदा नव्हे, तर सात वेळा फाळणी करून भारताचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारतावर त्यांनी अशा प्रकारे अत्यंत निर्घृण आघात करूनही भारतीय संस्कृती अविचल आणि अभंग राहिली आहे. आघात करणाऱ्या शक्तींचा पुढच्या काळात ऱ्हास झाला. पण भारताची संस्कृती आजही दिमाखात उभी आहे. हीच बाब भारताला भविष्यकाळात यशाच्या चरम सीमेवर नेऊन ठेवणार आहे. भारतीयांनी या संस्कृतीचा अभिमान मिरविला पाहिजे, अशी ओजस्वी मांडणी त्यांनी केली.
सध्याची परिस्थिती गुंतागुंतीची
सध्या जगाच्या राजकारणात गुंतागुंतीची आणि अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यापार शुल्काच्या माध्यमातून नवा ‘कर दहशतवाद’ जगावर लादला आहे. मात्र, हे अमेरिकेचे पारंपरिक धोरण नाही. आज इंधन तेलाचे राजकारणही त्या तेलापेक्षाही निसरडे ठरत आहे. म्हणूनच अमेरिका भारतावर रशियाकडून तेल घेऊ नका, असा दबाव आणत आहे. तसेच, अमेरिका आज पाकिस्ताला केवळ त्याच्या जगातल्या मोक्याच्या भौगोलिक स्थानामुळे महत्त्व देत आहे. याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असला तरी ही स्थिती अधिक काळ टिकणार नाही. भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून पाकिस्तानला दणका दिल्याने एकाच वेळी अमेरिकेचा आणि चीनचाही दारुण अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे हे देश भारतावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तथापि, भारताचा आत्मविश्वास आता वाढला असून तो स्वबळावर पुढील वाटचाल करण्यास सक्षम आहे, असेही प्रतिपादन करंजीकर यांनी केले.
पाच शक्ती ठरविणार जगाचे भवितव्य
एकवीसाव्या शतकात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे चार नेते आणि जर्मनी, जपान तसेच फ्रान्स हे देश अशा पाच शक्ती जगाचे भवितव्य ठरविणार आहेत. भारताने आता आपल्यातले अंत:स्थ सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने परिस्थतीला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला अडवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या व्याख्यानाला बेळगावकर श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी इनरव्हील क्लब बेळगावच्या अध्यक्षा अपर्णा भटकळ यांनी स्वागत केले. स्वाती कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सोनल धामणकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. बेला शिवलकर यांनी आभार मानले.









