दुशांबेमध्ये एनएसए अजित डोवाल यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ दुशांबे
अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये अनेक देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एकत्र आले आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील शुक्रवारी दुशांबेमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सामील झाले. डोवाल यांच्यासह ताजिकिस्तान, रशिया, कजाकिस्तान, उझ्बेकिस्तान, किर्गिस्तान आणि चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी या चर्चेत भाग घेतला आहे. भारत नेहमीच अफगाणिस्तानचा महत्त्वपूर्ण भागीदार राहिला आहे आणि भविष्यातही राहणार असल्याचे डोवाल यांनी म्हटले आहे.
सर्व देशांच्या एनएसएनी अफगाणिस्तान आणि क्षेत्राच्या स्थितीवर चर्चा केली आहे. अफगाणिस्तानतात शांतता प्रस्थापित करणे आणि स्थैर्य निश्चित करणे तसेच दहशतवाद विरोधी लढय़ासाठी मार्ग शोधण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आहे.
बैठकीत सामील झालेल्या डोवाल यांनी भारताची भूमिका मांडली आहे. भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या लोकांसोबत उभा राहिला आहे. ऑगस्ट 2021 नंतर भारताने 17 हजार मेट्रिक टन गहू, कोव्हॅक्सिनच्या 5 लाख डोस, 13 टन आवश्यक जीवनरक्षक औषधे आणि हिवाळय़ासाठी कपडय़ांसह 60 दशलक्ष अन्य लसींचे डोस अफगाणिस्तानला पुरविल्याची माहिती डोवाल यांनी दिली.
क्षेत्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका निर्माण करणारा दहशतवाद आणि दहशतवादी गटांना सामोरे जाण्यासाठी अफगाणिस्तानची क्षमता वाढविण्याची गरज आहे. समाजाच्या सर्व घटकांदरम्यान सहकार्य करण्यात देखील भारताची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. समाजाच्या भविष्याठी महिला आणि तरुण-तरुणींची अफगाणिस्तानात महत्त्वाची भूमिका आहे. मुलींना शिक्षण आणि रोजगाराची तरतूदच विकासाला चालना देणारी ठरणार आहे. याचा सकारात्मक सामाजिक प्रभावही होईल तसेच तरुणाईमधील कट्टरवादी विचारसरणी संपुष्टात येणार असल्याचे डोवाल यांनी बैठकीला संबोधित करताना म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या लोकांसोबत शतकांपासून भारताचे विशेष संबंध राहिले आहेत. परिस्थिती कुठल्याही प्रकारची असली तरीही भारताचा अफगाणिस्तानसंबंधीचा दृष्टीकोन बदलणार नाही. अफगाणिस्तानात सर्व लोकांच्या अधिकारांचे रक्षण आणि सन्मानजक जीवनासोबत त्यांच्या मानवाधिकारांची सुरक्षा व्हायला हवी असे डोवाल यांनी नमूद केले आहे.









