नवी दिल्ली :
भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षामध्ये 6.5 टक्के इतका राहणार असून जी 20 राष्ट्रांच्या तुलनेमध्ये पाहता भारताची कामगिरी निश्चितच उंचावणारी असणार असल्याचे मत रेटिंग एजन्सी मुडीज यांनी व्यक्त केले आहे.
विकासासाठी अनेक कारणे
एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला असून अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर सवलतीसह इतर सवलतींची घोषणा केल्याने देशाचा विकास आगामी काळात वरच्या स्तरावर कार्यरत राहणार आहे. पतधोरणाअंतर्गत व्याजदरामध्ये कपात केल्याची भूमिका तसेच इतर पोषक बाबी भांडवल वाढीसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत, असेही मूडीज यांनी म्हटले आहे. भविष्यातील बाजारपेठा या संदर्भातील अहवालामध्ये मूडीज यांनी भारताच्या एकंदर विकासाबाबत भाष्य केले आहे. जी 20 राष्ट्रांमध्ये पाहता भारत हा विकासाच्याबाबतीत सरस कामगिरी करणार आहे. भारताचा विकास हा वरच्या दिशेने सरकणार असून त्यासाठी सरकारची धोरणे जबाबदार राहणार आहेत.
चीनची गत
भारताव्यतिरिक्त चीनचा विचार करता पायाभूत सुविधा आणि उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आणि निर्यातीचा स्तर वाढलेलाच दिसून येणार आहे मात्र चीनमध्ये देशांतर्गत मागणीमध्ये घसरण पाहायला मिळणार आहे, असे अहवालात मूडीजने नोंदवले आहे.









