वृत्तसंस्था / नवी मुंबई
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाला अलिकडेच ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेटमध्ये एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. आता भारतीय महिला संघाची सत्त्वपरीक्षा विंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेत राहिल. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येथे रविवारपासून प्रारंभ होईल. या मालिकेतील सर्व सामने शनव्या मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जातील.
भारत आणि विंडीज या दोन संघांमध्ये यापूर्वी झालेल्या टी-20 च्या शेवटच्या आठ सामन्यात विंडीज महिला क्रिकेट संघाला एकताही सामना जिंकता आलेला नाही. 2019 च्या नोव्हेंबरपासून उभय संघातील झालेले सर्व म्हणजे आठही सामने भारताने जिंकले आहेत. भारतीय महिला संघातील महत्त्वाचे फलंदाज सध्या फॉर्ममध्ये नसल्याने भारताची फलंदाजी कमकुवत झाल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाने शतक झळकावून आपल्याला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे दाखवून दिले आहे. पण तिचे हे शतक वाया गेले. भारतीय संघातील आणखी एक अष्टपैलु दिप्ती शर्मा ही सूर मिळविण्यासाठी गेल्या काही सामन्यांत झगडत आहे. रॉड्रिग्ज, रिचा घोष, कर्णधार कौर यांच्याकडून अलिकडच्या काही सामन्यांत समाधानकारक कामगिरी झालेली नाही. निवड समितीने या मालिकेसाठी शेफाली वर्माला पुन्हा वगळले आहे. पूजा वस्त्रकर, श्रेयांका पाटील, यास्तिक भाटिया, प्रिया पुनिया यांना तंदुरुस्तीच्या कारणावरुन संघातून वगळण्यात आले आहे. 2024 च्या क्रिकेट हंगामात शेफाली वर्माने 20 सामन्यातून 531 धावा जमविल्या असल्या तरी तिला या मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. शेफालीच्या गैरहजेरीत रिचा घोषवर अतिरिक्त जबाबदारी पडली आहे. अरुंधती रे•ाrलाही या मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. स्मृती मानधनाने 20 सामन्यांत 570 धावा जमविल्या आहेत.
भारताप्रमाणेच विंडीजच्या कामगिरीत फारसा फरक दिसत नाही. चालु वर्षाच्या क्रिकेट हंगामात विंडीज महिला संघाने 13 पैकी 9 टी-20 जिंकले आहेत. अलिकडच्या कालावधीत झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विंडीजने इंग्लंडचा धक्कादायक पराभव केला होता. कर्णधार हिली मॅथ्युज आणि नवोदित क्वीना जोसेफ यांची या स्पर्धेतील कामगिरी निर्णायक ठरली होती. भारता विरुद्धच्या मालिकेसाठी अष्टपैलु दिनेंद्र डॉटीनचे विंडीज संघात पुनर्गामन झाले आहेत. मात्र दुखापतीमुळे अष्टपैलु स्टीफेनी टेलर या मालिकेत खेळू शकणार नाही.









