वृत्तसंस्था/ रॉसेयू (डॉम्निसिया)
यजमान विंडीज आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. एकवेळी आपल्या वेगवान गोलंदाजीने जागतिक क्रिकेटवर मक्तेदारी करणाऱ्या विंडीजला मात्र यावेळी 2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. दरम्यान आम्ही विंडीज संघाला कमी लेखणार नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. या मालिकेत नवोदित यशस्वी जैस्वालच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रेग ब्रेथवेटकडे विंडीजचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
या मालिकेतील पहिली कसोटी येथील विंडसर पार्क स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. विंडीज संघाने गेल्या तब्बल 21 वर्षांच्या कालावधीत पहिल्या सामन्यात भारतावर कसोटी विजय मिळवलेला आहे. ब्रेथवेटच्या नेतृत्वाखाली विंडीजचा संघ कसोटीतील आपल्या विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय संघामध्ये पुनरागमन करणारा उपकर्णधार अजिंक्य रहाणे या मालिकेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र अनुभवी चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळल्याने आता ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या नवोदित खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत गेल्या जूनमध्ये भारतीय संघाला बलाढ्या ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली होती. त्यामुळे भारताला या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारली पण न्यूझीलंडने जेतेपद मिळवल्याने भारताला उपविजेतेपद मिळाले होते. भारताच्या आयसीसीच्या विश्व कसोटी 2023-25 च्या मोहिमेला विंडीजविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे.
अद्याप बरेच क्रिकेट बाकी : रहाणे
या मालिकेसाठी भारतीय खेळाडूंनी समाधानकारक सराव केला आहे. घरच्या भूमीवर विंडीजने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत विविध संघांविरुद्ध चांगली कामगिरी कसोटी क्रिकेटमध्ये केली असल्याने आम्ही त्यांना कमी लेखणार नाही असे प्रतिपादन भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केले आहे. भारतीय कसोटी संघामध्ये उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाल्याबद्दल रहाणेने समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी आपण चार ते पाच वर्षे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून कार्यरत होतो. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांना या दौऱ्यात कसोटी क्रिकेट पदार्पणाची संधी मिळाल्याबद्दल रहाणेने निवड समितीचे आभार मानले आहे. कर्णधार रोहित शर्माकडून जी जबाबदारी सोपवली जाईल ती मी समर्थपणे स्वीकारेन असेही रहाणेने म्हटले आहे. अद्याप बरेच क्रिकेट माझ्यासाठी शिल्लक असल्याचे अजिंक्यने म्हटले आहे.
या मालिकेत भारतीय संघाला बुमराहची उणीव निश्चितच जाणवेल पण मोहमद सिराज, शार्दुल ठाकुर आणि नवदीप सैनी यांच्याकडून नवा चेंडू विंडीजच्या खेळपट्ट्यावर चांगल्या तऱ्हेने हाताळला जाईल, असेही रहाणेने म्हटले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा हे या संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 474 बळी घेतले असून जडेजाने 268 बळी नोंदवले आहेत. या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत जवळपास 750 बळींचा टप्पा गाठला आहे. विंडीजच्या खेळपट्ट्यावर नेहमीच वेगवान गोलंदाजी प्रभावी असल्याने भारतीय संघात चार गोलंदाजांची निवड केली जाईल त्यामुळे जडेजा आणि अक्षर पटेल अष्टपैलू असल्याने त्यांचे अंतिम 11 खेळाडूतील स्थान निश्चित राहिल तर रविचंद्रन अश्विनचा एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून वापर केला जाईल. दोन वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकेल. त्यामुळे उनादकट, मुकेशकुमार आणि नवदीप सैनी यापैकी एकाला कदाचित संघात स्थान मिळू शकेल.
विंडीज संघामध्ये होल्डर, जोसेफ, केमर रॉच, रिफेर हे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. कर्णधार ब्रेथवेट, उपकर्णधार ब्लॅकवूड, टी. चंद्रपॉल, जोशुआ डिसिल्वा, कॉर्नवॉल हे विंडीजचे प्रमुख फलंदाज आहेत.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), गिल, गायकवाड, कोहली, जैस्वाल, रहाणे (उपकर्णधार), के. एस. भरत, इशान किसन, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहमद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
विंडीज संघ- क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), ब्लॅकवूड (उपकर्णधार), जोशुआ डिसिल्वा, अॅथेन्जी, कॉर्नवॉल, गॅब्रियल, जेसन होल्डर, अल्झेरी जोसेफ, रिफेर, रॉच, टी. चंद्रपॉल, कर्क मॅकेन्झी आणि जोमेल वेरीकेन.
सामन्याची वेळ – सायंकाळी 7.30 वाजता