पाचपैकी दोन सामने होणार फ्लोरिडात, भारताचे पारडे जड, नवोदित खेळाडूंसाठी छाप पाडण्याची सुवर्णसंधी
वृत्तसंसथा/ तारूबा (त्रिनिदाद)
एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर 48 तासांपेक्षा कमी कालावधीत भारतीय संघाला टी-20 क्रिकेटला सामोरे जावे लागणार असून आज गुरुवारपासून येथे त्यांची वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेतही भारताचे पारडे जड दिसत असून तरुण खेळाडूंना आपली छाप पाडण्यासाठी ही मालिका म्हणजे एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होणार आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेला काही प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले होते. दुसऱ्या सामन्यातील धक्कादायक पराभवानंतर भारताने 2-1 अशा फरकाने ही मालिका ज्ंिांकली आणि एकंदर चित्र पाहता पाहुण्यांना टी-20 मालिका जिंकण्याचीही खूप संधी आहे. ब्रायन लारा स्टेडियमवरून सुरू होणार असलेल्या या पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये धडाकेबाज अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यासारख्या चांगली कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक बनलेल्या खेळाडूंना सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे वर्मा आणि जैस्वाल यांना भारताच्या टी-20 संघात प्रथमच स्थान मिळाले आहे आणि ते निश्चितच त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पहिल्याच बैठकीत संजू सॅमसनला परत आणले असून हा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज संधीचा फायदा घेऊन यंदाच्या विश्वचषक संघातील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असेल.
अलीकडच्या काळात वेस्ट इंडिजची सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये झालेली घसरण लक्षात घेता भारतीयांचे पारडे जड राहणे अपेक्षित आहे. रवी बिश्नोई देखील यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यासोबत संघात परतला आहे. अक्षर पटेलसह यादव व चहल हे फिरकीचे पर्याय असतील. शेवटचे दोन सामने फ्लोरिडा येथे होणार असलेल्या या मालिकेत हार्दिक आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव मधल्या फळीतील दोन स्थानांवर खेळतील, तर इशान किशन, शुभमन गिल आणि जैस्वाल हे वरची फळी सांभाळतील. ही एक भक्कम फलंदाजांची फळी आहे. त्यामुळे नाणेफेकीच्या वेळी कौल भारताच्या बाजूने लागल्यास भारतीयांकडून मोठी धावसंख्या उभारली जाण्याची अपेक्षा आहे.
नवोदित मुकेशच्या तीन बळींनी मंगळवारी येथे झालेल्या अंतिम एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या वरच्या फळीला हादरवून सोडले होते. त्याच्यासह अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि आवेश खान यांच्या खांद्यांवर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. पुढील वर्षी होणार असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघातील आपले स्थान पक्के करण्याचे ध्येय ते बाळगून असतील. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवांनंतर वेस्ट इंडिजला क्रिकेटचे हे धडाकेबाज स्वरुप देखील सोपे जाणार नाही.
यष्टिरक्षक-फलंदाज शाय होप आणि वेगवान गोलंदाज ओशेन थॉमस यांना रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय वेस्ट इंडिज संघाला बळकट करण्यासाठी परत बोलावण्यात आले आहे. 29 वर्षीय होप तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा कर्णधार राहिला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर कोलकाता येथे तो आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता. दुसरीकडे, 26 वर्षीय थॉमस मागील टी-20 सामना डिसेंबर, 2021 मध्ये कराचीत खेळला होता. त्यानंतर तो आता पुनरागमन करत आहे. पुढील वर्षी होणार असलेल्या टी-20 विश्वचषकाचे लक्ष्य समोर ठेवलेल्या या संघाचा उपकर्णधार म्हणून काईल मेयर्सची निवड करण्यात आली आहे.
आजच्या सलामीच्या सामन्यानंतर दोन्ही संघ 6 आणि 8 ऑगस्ट रोजी दुसरा आणि तिसरा सामना खेळण्यासाठी गयाना नॅशनल स्टेडियमवर जातील. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार असलेल्या सामन्यांनी मालिकेचा समारोप होईल.
संघ : भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशेन थॉमस.
वेळ : रात्री 8 पासून, थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स.









