सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसनसाठी संघातील स्थान पक्के करण्याची संधी,
वृत्तसंस्था/ ब्रिजटाउन (बार्बाडोस)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आज गुरुवारपासून खेळविली जाणार असून त्यात सूर्यकुमार यादवसमोर 50 षटकांच्या सामन्यांतील आपली विश्वासार्हता सुधारण्याचे लक्ष्य राहणार आहे, तर इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी शर्यत लागण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा होणार असून त्यापूर्वी आशिया चषक स्पर्धा होणार आहे. या दोन्ही स्पर्धा लक्षात घेऊन संघरचना निश्चित करण्याच्या दृष्टीने काही खेळाडूंची चाचणी घेण्यासाठी भारत वेस्ट इंडिजविऊद्धच्या या मालिकेचा वापर करेल.

दोन कसोटींप्रमाणेच भारत या मालिकेतही वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवण्याची अपेक्षा आहे. परंतु ही मालिका सूर्यकुमार, किशन, सॅमसन, यजुवेंद्र चहल आणि उमरान मलिक यांच्यासारख्या खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण संधी आहे. सूर्यकुमार एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या ‘टी-20’मधील फॉर्मची पुनरावृत्ती करू शकलेला नाही. मात्र तो जखमी श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर दावा करू शकतो. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मागील मालिकेत त्याने पहिल्या चेंडूवर खातेही न उघडता परतण्याची हॅट्ट्रिक नोंदवलेली असली तरी, ‘टी-20’मधील फटकेबाजीसाठी विख्यात असलेला हा गुणवान फलंदाज या मालिकेची सुरुवात धडाक्यात करेल अशी अपेक्षा आहे.
मांडीवरील शस्त्रक्रियेनंतर सावरत असलेला के. एल. राहुल जेव्हा परत येईल तेव्हा तो यष्टीरक्षकाच्या जागेसाठीचा सर्वांत प्रबळ दावेदार असेल. त्याच्या अनुपस्थितीत किशन आणि सॅमसन या दोघांनाही दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या स्थानावर दावा करण्याची संधी आहे. कारण विश्वचषकासाठी रिषभ पंत वेळेत तंदुऊस्त होण्याची शक्यता नाही. सॅमसनच्या बाबतीत कधी संघात, तर कधी संघाबाहेर असे चित्र पाहायला मिळालेले असले, तरी त्याला पुनरागमन करण्याच्या आणि 11 एकदिवसीय सामन्यांमधील आपली 66 ही सरासरी सुधारण्याच्या दृष्टीने या मालिकेत चांगली संधी मिळेल.
कसोटी मालिकेत फलंदाजीत आणि यष्टिरक्षणात छाप पाडलेला किशन हाच पहिल्या एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सॅमसन आणि सूर्यकुमार यांच्यात मधल्या फळीतील राहिलेल्या जागेसाठी शर्यत लागेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुऊवात करतील. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्यासाठी आणखी थोडा वेळ वाट पाहावी लागेल. उपकर्णधार हार्दिक पंड्या ‘आयपीएल’पासून खेळलेला नाही. त्याला एकदिवसीय सामन्यांनंतर पाच ‘टी-20’ सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याचा मुद्दा त्याच्यासमोर राहणार आहे. तो ‘टी-20’ संघाचे नेतृत्व करेल हे लक्षात घेता त्याला एकदिवसीय मालिकेत मध्ये विश्रांती दिली जाऊ शकते.
गोलंदाजीत वेगवान गोलंदाज उमरान मलिकला प्रभाव पाडण्याची ही आणखी एक संधी आहे. जम्मू काश्मीरमधील हा 23 वर्षीय खेळाडू भरपूर धावा देत आलेला असला, तरी बळी घेण्याचा बाबतीत तो एक चांगला पर्याय आहे. त्याने सात एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 बळी घेतले आहेत. चहल फिरकीपटूंच्या क्रमवारीत खाली गेला आहे आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मागील मालिकेत त्याच्याऐवजी कुलदीप यादवला पसंती देण्यात आली होती. त्यामुळे हा लेगस्पिनर संधीची आतुरतेने वाट पाहत असेल. जयदेव उनाडकट, मुकेश कुमार आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांच्यासोबत मोहम्मद सिराज वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल.
विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयशी झालेल्या वेस्ट इंडिजचे या मालिकेतून नव्याने सुऊवात करण्याकडे लक्ष असेल. शिमरॉन हेटमायर आणि ओशाने थॉमस यांच्या पुनरागमनामुळे संघाला बळ मिळेल. दोघेही शेवटची वनडे 2021 मध्ये खेळले होते. कसोटीत वेस्ट इंडिजच्या ज्या अवघ्या काही फलंदाजांनी चमक दाखविली त्यापैकी एक असलेल्या अॅलिक अथानाझेवरही लक्ष राहणार आहे.
संघ : वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अॅलिक अॅथनेझ, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सिनफेर, रॉविन सीफेर, जेडन सिल्स, रुमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशाने थॉमस.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.









