वृत्तसंस्था/ नवी मुंबई
नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या सहभागाविषयी अजूनही अनिश्चितता असताना आज गुऊवारी महिलांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज संघ आमनेसामने येतील तेव्हा भारत सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा आणि वेस्ट इंडिजच्या ‘पॉवर गेम’ तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. .
मालिकेच्या सलामीच्या सामन्यात 49 धावांच्या विजयामुळे भारताने या प्रकारातील आपली विजयी वाटचाल सलग नऊ विजयांपर्यंत वाढवली, परंतु वेस्ट इंडिजने दुस्रया सामन्यात यजमानांना नऊ गडी राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजने ज्या पद्धतीने 26 चेंडू आणि नऊ गडी राखून तसेच एकूण 27 चौकार आणि दोन षटकारांची बरसात करून विजय मिळवला त्यामुळे भारताची स्थिती डळमळीत झाली आहे.
सदर सामन्यात कोणतीही भारतीय गोलंदाज धोकादायक भासली नाही. त्यातच जास्त दव असल्यामुळे त्यांचे काम आणखी कठीण झाले. वेस्ट इंडिजने त्यांच्या फायद्यासाठी या परिस्थितीचा वापर केला. एका दिवसात परिस्थिती फारशी बदलण्याची अपेक्षा नसली, तरी कौरच्या उपलब्धतेविषयीची चिंता वगळता भारताला त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीत बरेच बदल करावे लागतील. कौरने गेल्या रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताच्या क्षेत्ररक्षणाच्या डावात भाग घेतला नव्हता आणि मंगळवारी गुडघा दुखत असल्यामुळे ती दुसरी लढत खेळू शकली नव्हती.
मालिकेतील निर्णायक सामन्यातील तिच्या अनुपलब्धतेमुळे भारताला फॉर्मात असलेल्या एका फलंदाजाला मुकावे लागेल. कारण कौरने तिच्या मागील तीन टी-20 सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावलेली आहेत. प्रभारी कर्णधार स्मृती मानधनाच्या मालिकेतील दुसऱ्या अर्धशतकाने भारताला समाधानकारक धावसंख्या नोंदविण्यास मदत केलेली असली, तरी उर्वरित फलंदाज पहिल्या सामन्यातील त्यांचा फॉर्म कायम राखू शकलेल्या नाहीत. त्यातच वेस्ट इंडिजने अचूक गोलंदाजी करून जास्त वाव न देण्याचे धोरण पत्करल्याने भारतीय फलंदाजांचे काम कठीण झालेले आहे. सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.









