वृत्तसंस्था/ बुरिराम (थायलंड)
एएफसी 17 वर्षांखालील महिलांच्या आशियाई चषक पात्रता फेरी-2 च्या पहिल्या सामन्यात भारताकडून निराशाजनक कामगिरी होऊन त्यांचा कोरियाने 8-0 असा दणदणीत पराभव केला. प्रशिक्षक प्रिया पी. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखालील मुलींना स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या बलाढ्या कोरियन संघाविऊद्धचा सामना खूप जड गेला.
मध्यांतरापर्यंत कोरिया प्रजासत्ताकच्या संघाने 2-0 अशी आघाडी घेतली होती. कर्णधार वॉन जुयुनची हॅट्ट्रिक हे या सामन्याचे आकर्षण ठरले. त्यापैकी दोन गोल तिने स्पॉट किकच्या आधारे केले. सेओ मिन्जेओंग पार्क जुहा आणि बदली खेळाडू हान गुखी यांनी इतर गोल केले. शिवानी टोप्पोने केलेल्या स्वयंगोलामुळे कोरियाची ही आघाडी आणखी वाढली.
भारताच्या मुख्य प्रशिक्षक प्रिया पी. व्ही. यांनी स्वाभाविकपणे बचावात्मक रणनीतीवर अधिक भर दिला आणि त्यांची योजना सुरुवातीपासून स्पष्टपणे दिसून आली. पहिली 13 मिनिटे भक्कमपणे बचाव केल्यावर सेंटर बॅक थोबिसाना चानू हिने चेंडू फटकावताना केलेली एक क्षणिक चूक भारताला महागात पडली आणि त्यांना पहिला गोल स्वीकारावा लागला. यावेळी पार्क जुहाला चेंडू जाळीत सारण्यास फारसे कष्ट पडले नाहीत.
28 व्या मिनिटाला सोनिबिया देवी इरोमने गोलक्षेत्रात वोन जुयुनच्या बाबतीत केलेले फाऊल महागात पडून जुयुनने त्याचा फायदा घेत गोल नोंदविला. तिसरा गोल मध्यांतरानंतर काही मिनिटांनी नोंदविला गेला. तो वॉन जुयुनचा दिवसाचा दुसरा गोल होता. भारताने खुशी कुमारीच्या जागी गोलरक्षक म्हणून खांबी चानू सारंगथेमला आणल्यानंतर लगेच 65 व्या मिनिटाला जुयुनने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.









