तवी नदीची पातळी वाढल्यावर केले अलर्ट : मानवीय आधारावर उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर भारतात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे स्थिती बिघडली आहे. नद्यांची पातळी वेगाने वाढल्यावर भारताने पाकिस्तानला पूरसंकटाबद्दल सतर्क केले आहे. तवी नदीची पातळी वाढल्यावर भारताने पाकिस्तानला वेळीच कळविले आहे. भारताकडून बुधवारी जारी अलर्टनुसार अनेक मोठ्या धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले असून यामुळे पाकिस्तानच्या क्षेत्रांवर पुराचे संकट घोंगावू लागले आहे. भारताने हा अलर्ट मानवीय आधारावर दिला आहे.
भारताने सोमवारी पहिला अलर्ट जारी केला होता. यानंतर मंगळवारी आणि बुधवारीही पाकिस्तानला अलर्ट देण्यात आला. तवी नदीत पुराची उच्च शक्यता असल्याचे यात म्हटले गेले आहे. तवी नदी हिमालयात उगम पावून जम्मू क्षेत्रातून जात पाकिस्तानात चिनाब नदीत सामील होते. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक धरणांचे दरवाजे उघडावे लागल्याने जलपातळी वाढली आहे.
भारताने दाखविली माणुसकी
भारत आणि पाकिस्तान दरम्यान 1960 साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू जल करार झाला होता. या कराराच्या अंतर्गत दोन्ही देशांकडून जलस्रोत आणि नद्यांशी निगडित आकडेवारी परस्परांना पुरविली जात होती. परंतु चालू वर्षी 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने नियमित हायड्रोलॉजिकल डाटाचे आदान-प्रदान रोखले होते. तरीही भारताने माणुसकी दाखवून देत यावेळी पुरासंबंधी अलर्ट जारी करत पाकिस्तानातील जीवितहानी आणि आर्थिक हानी रोखण्यासाठी त्याला सतर्क केले आहे.
पंजाब अन् जम्मूमध्ये नद्यांना पूर
पंजाबमध्ये सतलज, व्यास आणि रावी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तर जम्मूमध्येही निरंतर पाऊस पडत असल्याने नद्यांचे पात्र रौद्र रुप धारण करून आहे. जलस्तर वाढल्याने प्रशासनाला धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. हे पाणी रोखून ठेवले असते तर मोठ्या दुर्घटनांची भीती होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
माणुसकीच्या आधारावर पाऊल
हा अलर्ट पाकिस्तानला केवळ मानवीय दृष्टीकोनातून देण्यात आला आहे. पुराच्या स्थितीत सीमापार देखील गंभीर नुकसान होऊ शकते, याचमुळे वेळीच अलर्ट पाठविणे आवश्यक होते असे भारताने स्पष्ट केले आहे. आणखी काही दिवस पाऊस सुरूच राहिल्यास स्थिती आणखी बिघडू शकते असे तज्ञांचे सांगणे आहे. तर भारताने उचललेल्या या पावलाला सीमापार आपत्ती व्यवस्थापन सहकार्याचे उदाहरण मानले जात आहे.









