वृत्तसंस्था/ इस्ट लंडन
दक्षिण आफ्रिकेत महिलांच्या तिरंगी टी-20 मालिकेत भारतीय महिला संघाचा सामना सोमवारी येथे विंडीजबरोबर होणार आहे. या मालिकेत भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रित कौरच्या गैरहजेरीत भारतीय महिला संघाने पहिला सामना मोठय़ा फरकाने जिंकला होता. सोमवारच्या सामन्यात कर्णधार कौर खेळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचप्रमाणे पहिल्या सामन्यात अंतिम 11 खेळाडूत शिखा पांडे, रेणुकासिंग ठाकुर आणि पूजा वस्त्रकार सहभागी झाल्या नव्हत्या. हंगामी कर्णधार म्हणून स्मृती मानधनाकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघातील अमनज्योत कौरने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. अमनज्योत कौरने आपल्या पहिल्याच सामन्यात 30 चेंडूत 41 धावा जमवत आपल्या संघाला 27 धावांनी विजय मिळवून दिला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अमनज्योत कौरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. सोमवारच्या सामन्यात अमनज्योत कौरकडून पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारी महिन्यात आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होणार असून सध्याची तिरंगी टी-20 मालिका ही शेवटची सरावाची राहिल. ही तिरंगी मालिका 2 फेब्रुवारीला संपणार आहे. भारतीय संघ-स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्मस, देविका वैद्य, एस. मेघना, हरमनप्रित कौर (कर्णधार), देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, शिखा पांडे, यास्तिका भाटिया, सुषमा वर्मा, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुकासिंग ठाकुर, मेघना सिंग, अंजली सर्वानी, स्नेह राणा व अमनज्योत कौर.









