मागील पाच वर्षांतील जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याची रोहित शर्माच्या संघाला नामी संधी, अक्षर पटेलच्या सहभागाबद्दल दुखापतीमुळे साशंकता, वॉशिंग्टन सुंदरला बोलावणे
वृत्तसंस्था /कोलंबो
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज रविवारी येथे भारताचा सामना तुलनेने कमकुवत श्रीलंकेशी होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एखाद्या बहुराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याच्या बाबतीत मागील पाच वर्षांपासून पडलेला दुष्काळ संपविण्यास उत्सुक असेल. भारत जरी आशिया चषकाचा प्रबळ दावेदार असला, तरी काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. अक्षर पटेल हा भारतीय संघातील एक महत्त्वाचा घटक असून त्याला झालेल्या दुखापती ही चिंतेची बाब आहे, तर श्रीलंकेला त्यांचा प्रमुख फिरकीपटू महेश थेक्षानाची उणीव भासेल. थेक्षानाही सध्या दुखापतग्रस्त आहे. भारताने जिंकलेल्या चषकांवरून एक नजर टाकल्यास त्यांनी गेल्या पाच वर्षांत एकही विजेतेपद पटकावलेले नाही हे अस्वस्थ करणारे सत्य उघड होईल आणि ही जेतेपदाने हुलकावणी देण्याची मालिका खंडित करण्याची आज त्यांना चांगली संधी असेल. विश्वचषकापूर्वी असा विजय आदर्श प्रोत्साहन देऊन जाईल. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचा विचार करता भारताला शेवटचे विजेतेपद 2018 मध्ये प्राप्त झाले होते. त्यावेळी रोहितच्या संघाने दुबई येथे झालेल्या आशिया चषकात बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला होता.
त्या विजयापासून सामन्यावर व परिस्थितीवर वर्चस्व गाजविण्याच्या बाबतीत भारताची दिसून आलेली असमर्थता धक्कादायक आहे. 2019 व 2023 मधील जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविऊद्ध पराभूत होण्याबरोबरच भारताला 2019 मधील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात आणि 2022 मधील टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीच्या पार जाता आले नाही. गेल्या वर्षीच्या श्रीलंकेने जिंकलेल्या आशिया चषकातही त्यांना आपले अस्तित्व ठळकपणे जाणवू देता आले नव्हते. ती स्पर्धा ‘टी20’ पद्धतीने खेळवली गेली होती. तथापि, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संघाला आज ही परिस्थिती बदलून चषक जिंकण्याची खूप चांगली संधी आहे. शुक्रवारी बांगलादेशविऊद्धच्या ‘सुपर फोर’ स्तरावरील सामन्यासाठी विश्रांती देण्यात आलेल्या पाच खेळाडूंना भारत समाविष्ट करून घेणार आहे. त्या सामन्यात भारतीय संघ अखेरीस सहा धावांनी पराभूत झाला होता. शिखर सामन्यासाठी विराट कोहली आणि हार्दिक पंड्याचे पुनरागमन बांगलादेशच्या फिरकीपटूंविऊद्ध धडपडलेल्या फलंदाजीला निश्चितच बळ देऊन जाईल.
बांगलादेशविरुद्ध सलामीवीर शुभमन गिलने अव्वल दर्जाचे शतक केले, परंतु उर्वरित फलंदाज खास करून मधल्या षटकांमध्ये प्रभावीपणे ‘स्ट्राइक’ फिरवू शकले नाहीत, ज्यामुळे तळाकडच्या फलंदाजांवरील भार वाढला. या सामन्याने भारताची आणखी एक त्रुटी देखील उघडी पाडली, ज्यावर त्यांना काम करावे लागेल. ही त्रुटी म्हणजे लवकर काही बळी मिळविल्यानंतर देखील प्रतिस्पर्धी संघाला लवकर गुंडाळण्यात आलेले अपयश. भारताने बांगलादेशची 4 बाद 59 अशी अवस्था केली होती, परंतु गोलंदाजांनी शेवटच्या टप्प्यात बऱ्याच धावा दिल्या, ज्यामुळे बांगलादेशला 265 धावा करता आल्या. पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनी आजच्या सामन्यात पुनरागमन केल्यानंतर हा प्रश्न सुटेल, अशी आशा संघ व्यवस्थापन बाळगून असेल.
बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात अक्षरच्या उजव्या हाताला आणि करंगळीला दुखापत झाली आहे. त्याशिवाय तो धोंडशिरेच्या दुखापतीने ग्रस्त आहे. जरी संघ व्यवस्थापनाने ते या डावखुऱ्या फिरकीपटूच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितलेले असले, तरी त्यांनी ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून आणले आहे. वॉशिंग्टन भारताच्या आशियाई खेळांत सहभागी होणार असलेल्या संघासह बंगळूरमध्ये सराव करत होता. या जरी आशिया चषकापुरत्या समस्या असल्या, तरी त्या हाताळताना दूरगामी विचार करावा लागणार आहे. सराव सामन्यांच्या व्यतिरिक्त भारताला विश्वचषकापूर्वी चार एकदिवसीय सामने खेळण्यास मिळणार आहेत. त्यात आशिया चषकाचा अंतिम सामना आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धचे तीन सामने यांचा समावेश होतो. आशिया चषक स्पर्धेत जेतेपद मिळाल्यास पुढील महिन्यात होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा आत्मविश्वास खचितच वाढेल. दुसरीकडे, श्रीलंकेलाही भारताविऊद्धच्या त्यांच्या संधींबद्दल आत्मविश्वास वाटेल, कारण यजमानांनी 15 एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवलेला आहे.
फायनलमध्ये भारत-लंका आठव्यांदा आमनेसामने
आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका 1988 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. या स्पर्धेत भारताने बाजी मारली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आतापर्यंत सातवेळा आशिया चषकाची फायनल रंगली होती. यामध्ये भारताने चारवेळा बाजी मारली आहे. तर श्रीलंका संघाने तीन वेळा स्पर्धेवर नाव कोरले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 1991 दुसऱ्यांदा फायनल झाली होती, यामध्ये भारताने बाजी मारली. तिसऱ्यांदा 1995 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यामध्येही भारताने बाजी मारली होती. भारताने सलग तीन वेळा श्रीलंकेला हरवत आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर श्रीलंका संघाने पलटवार करत भारताला फायनलमध्ये नमवत सलग तीन वेळा जेतेपद पटकावले होते. आता 2023 मध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. आज होणाऱ्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आजच्या विजेतेपदाच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
फायनलमध्येही पावसाचा व्यत्यय?
आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात आज होणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. श्रीलंकेत आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या. स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता फायनलच्या लढतीतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार, 17 रोजी कोलंबोमध्ये सुमारे 80 टक्के पावसाचा अंदाज आहे. आजच्या दिवशी दुपारी 1 ते 7 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सामन्यात अडचणी येऊ शकतात. दरम्यान, आशिया कपच्या फायनलसाठी पुढचा दिवस म्हणजेच 18 सप्टेंबर हा राखीव ठेवण्यात आला आहे.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर (जखमी अक्षर पटेलसाठी राखीव खेळाडू).
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निस्सानाका, दिमुथ कऊणारत्ने, कुसल जेनिथ पेरेरा, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, धनंजया डिसिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, मथिशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशन.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.









