वृत्तसंस्था/ हनोई
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी व्हिएतनामचे विदेशमंत्री बुई थान सोन यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान व्यापार, ऊर्जा, संरक्षण आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. याचबरोबर जयशंकर आणि सोन यांनी संयुक्त स्वरुपात भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील राजनयिक संबंधांच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकीटांना जारी केले आहे.
कलरिपयट्टू आणि वोविनमला दर्शविणारे टपाल तिकीट क्रीडाप्रकारांबद्दल आमची संयुक्त मजबुती दाखविते. याचबरोबर भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील मजबूत सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकांमधील संबंधांचा जल्लोष दर्शवित असल्याचे दोन्ही नेत्यांकडून म्हटले गेले आहे.
व्हिएतनामच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यावर पोहोचलेले जयशंकर यांनी हनोईमध्ये 18 व्या भारत-व्हिएतनाम संयुक्त आयोगाच्या बैठकीत भाग घेतला. यावेळी त्यांनी सोन यांचे आभार मानले आहेत. सोन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत राजनयिक, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, न्यायिक, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, विकास, शिक्षण आणि प्रशिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी मुद्दे सामील होते अशी माहिती जयशंकर यांनी दिली आहे. दोन्ही देशांमधील व्यापक रणनीतिक भागीदारी आगामी वर्षांमध्ये आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे.









