मोदी सरकारचा बिडेन प्रशासनाला स्पष्ट संदेश :
► वृत्तसंस्था/ ढाका
भारत आणि अमेरिका हे धोरणात्मक भागीदार झाले असून चीनच्या अरेरावी विरोधात हिंद-प्रशांत क्षेत्रात एकत्र आले आहेत. भारत आणि अमेरिकेच्या या मैत्रीदरम्यान आशियात तणावाचे ढग दाटले आहेत. दोन्ही देशांदरम्यान वादाचे कारण बांगलादेश ठरला आहे. बांगलादेशात होणाऱ्या आगामी निवडणुकीवरून अमेरिकेच्या भूमिकेवर भारत भडकला आहे. अमेरिकेने बांगलादेशात शेख हसीना सरकारला अस्थिर करण्यासाठी उचलण्यात आलेली पावले भारताच्या सुरक्षेसाठी हितकारक नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेची पावले केवळ भारताची सुरक्षा नव्हे तर पूर्ण दक्षिण आशियासाठी सकारात्मक नाहीत. अमेरिकेप्रमाणे आम्ही देखील एक स्वतंत्र अन् निष्पक्ष निवडणूक इच्छितो असे भारताने स्पष्ट पेले आहे. 3 आठवड्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या नवी दिल्लीत जी-20 शिखर परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र दिसून येणार असल्याने भारताने मांडलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
बांगलादेशात कट्टरवाद्यांना बळ
भारताने अमेरिकेला दिलेला इशारा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कट्टरवादी पक्ष जमात-ए-इस्लामीला ‘राजकीय सूट’ देण्यात आल्यास बांगलादेशात भविष्यात कट्टरवाद्यांची सत्ता येईल आणि उदारमतवादी वातावरण संपून जाईल. बांगलादेशात शेख हसीना सरकार कमकुवत झाल्यास ते भारत तसेच अमेरिकेसाठी चांगले ठरणार नसल्याचे भारताच्या रणनीतिकारांचे मानणे आहे. भारताने अनेक बैठकांमध्ये अमेरिकेला बांगलादेशविषयी सतर्क केले आहे.

सुरक्षास्थितीत बदल
अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यावर पूर्ण क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलली आहे. अफगाणिस्तानात तालिबानने स्वत:ची पकड मजबूत केली आहे. अमेरिकेने तालिबानसोबत करार करताना तेथील महिला, मुले आणि अल्पसंख्याकांचा विचार केला नाही. आता याचे दुष्परिणाम स्पष्ट दिसून येत आहेत. भारताच्या शेजारच्या देशांबद्दलच्या अमेरिकेच्या धोरणामुळे भारत सरकारची काही प्रमाणात कोंडी होत असल्याचे मानले जात आहे.
चीनचा प्रभाव वाढणार
भारत आणि बांगलादेशदरम्यान मोठी भूसीमा आहे. बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाल्यास याचा प्रभाव भारताच्या सुरक्षेवर पडणे निश्चित आहे. जमात-ए-इस्लामीला संरक्षण देण्यात आल्यास बांगलादेशातून भारतविरोधी दहशतवादी कारवाया वाढण्याची भीती आहे. याचबरोबर बांगलादेशात चीनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढणार असून अमेरिकेसाठीही ही स्थिती संकटाची असणार असल्याचे भारताने निदर्शनास आणून दिले आहे. बांगलादेशातील या कट्टरवादी संघटनेला इस्लामिक राजकीय संघटना ठरविण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे. अमेरिकेकडून त्याची तुलना मुस्लीम ब्रदरहुडशी केली जात आहे. जमात-ए-इस्लामीमागे पाकिस्तानचा हात असल्याचे भारताचे मानणे आहे.









