कोप इंडिया 23’ अंतर्गत कलाईकुंडा अन् आग्रा वायुतळावर आयोजन ः जपानही होणार सामील
वृत्तसंस्था / कलाईकुंडा
चीनसोबत वाढत्या वादादरम्यान भारत आणि अमेरिकेच्या वायुदलाने सोमवारी युद्धाभ्यासास प्रारंभ केला आहे. पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा आणि उत्तरप्रदेशच्या आग्रा वायुतळावर आयोजित होणाऱया या युद्धाभ्यासाला ‘कोप इंडिया 23’ नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील युद्धाभ्यासात एअर मोबिलिटी, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टवर भर असणार आहे. दोन्ही देशांच्या वायुदलाकडून सी-130जे आणि सी-17 विमान तैनात केले जाणार आहे. अमेरिकेचे वायुदल एमसी-130 जे विमानही तैनात करणार आहे.
भारत आणि अमेरिकेच्या वायुदलांमधील हा युद्धाभ्यास 4 वर्षांनी होत असून यात जपानही भाग घेत आहे. काही दिवसांपूर्वी चीनने अरुणाचल प्रदेशच्या 11 ठिकाणांसाठी नवी नावे जाहीर करत भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता. भारताने यावर प्रत्युत्तर देत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहणार असल्याचे म्हटले होते.
चीनचे आव्हान पेलण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याचे पॅसिफिक कमांड भारताशी समन्वय साधून आहे. अलिकडच्या काळात अमेरिकेने भारतासोबत सैन्यसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. शस्त्रास्त्र खरेदीप्रकरणी अमेरिका सातत्याने भारताची रशियावरील निर्भरता संपविण्यासाठी प्रयत्न करत आहे.









