अंतिम लढतीत थायलंडवर 7-2 गोलफरकाने मात
वृत्तसंस्था/ सालालाह, ओमान
भारतीय महिलांनी अंतिम लढतीत थायलंडचा 7-2 असा धुव्वा उडवित येथे झालैल्या पहिल्या महिला आशियाई हॉकी फाईव्ह विश्वचषक पात्रता स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठत भारताने याआधीच पुढील वर्षी मस्कतमध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी फाईव्ह स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती.
अंतिम सामन्यात भारतातर्फे मारियाना कुजुर (2 व 8 वे मिनिट), ज्योती (10 व 27 वे मिनिट) यांनी प्रत्येकी 2 तर मोनिका दिपी टोप्पो (7 वे मिनिट), कर्णधार नवजोत कौर (23 वे मिनिट), महिमा चौधरी (29 वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. थायलंडचे गोल कुंजिरा इन्पा (5 वे मिनिट) व सानपाऊंग कोर्नकनोक (5 वे मिनिट) यांनी नोंदवले. पुढील वर्षी 24 ते 27 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या महिलांच्या पहिल्या विश्वचषक हॉकी फाईव्ह स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र ठरले आहेत.
प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱ्या भारताने सर्व अडथळे दूर करीत झटपट पहिला गोल नोंदवून आघाडी घेतली. दुसऱ्याच मिनिटाला कुजुरने शानदार मैदानी गोल केला. पण थायलंडनेही लागोपाठ दोन गोल नोंदवून भारतावर आघाडी घेतली. इन्पा व कोर्नकनोक यांनी हे गोल नेंदवले. फॉर्ममध्ये असलेल्या टोप्पोने लगेचच प्रत्युत्तर देत शानदार मैदानी गोल नोंदवून भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. पुढच्याच मिनिटाला कुजुरने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत भारताला आघाडीवर नेले. पूर्वार्ध संपण्यास चार मिनिटे असताना ज्योतीने गोल करीत ही आघाडी 4-2 अशी केली.
उत्तरार्धातही भारताने वेगवान व अचूक खेळावर भर देत थायलंडच्या बचावफळीची वारंवार कसोटी घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. कर्णधार नवजोतने संघाचा पाचवा गोल नोंदवला तर तीन मिनिटे असताना ज्योतीने आणखी एका गोलाची त्यात भर टाकल्यानंतर महिमा चौधरीने आणखी एक गोल नोंदवत भारताचा 7-2 असा विजय व जेतेपद निश्चित केले.
या यशानंतर हॉकी इंडियाने विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 1 लाख देण्याचे जाहीर केले.