‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे भारत-ब्रिटन व्यापार करारामुळे एक नवी भागीदारीची चौकट विकसित करण्यात आली आहे.’ प्रामुख्याने भारतातील शेतकरीवर्ग तसेच लघु व मध्यम उद्योग, भारतीय हिरे आभूषणे तसेच पादत्राणे नील उद्योग म्हणजे मत्स्य व्यवसाय (सी फूड) तसेच अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा (ए.आय.) या सर्व क्षेत्रांना या कराराचा निश्चित लाभ होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे आणि आगामी वर्षभरात ती तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करू शकेल, या दृष्टीने भारत-ब्रिटन दरम्यान झालेल्या मुक्त व्यापार कराराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हा करार स्वातंत्र्योत्तर काळातील एक सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे वळणबिंदू म्हणून अधोरेखित केला पाहिजे. त्याचे कारण असे की, भारतावर 1757 ते 1947 म्हणजेच 240 वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना भारताचे वाढते प्रभुत्व व वैभव लक्षात घेऊन व्यापार करार करावा लागला, ही गोष्ट प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने निश्चितपणे अभिमानास्पद आहे. ब्रिटनशी करार करून भारताने अमेरिकेला निर्भरतेचा संदेश दिला आहे.
नवे पर्व
भारत-ब्रिटन दरम्यान झालेला नवा मुक्त व्यापार करार, हे प्रदीर्घ परिश्रमाचे फलित होय. गेल्या दीड दशकापासून या कराराच्या दिशेने प्रयत्न केले जात होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि नीती आयोगाने टाकलेली दमदार पावले यामुळे जगातील अनेक राष्ट्र भारताशी मुक्त व्यापार करार करण्यासाठी उत्सुक आहेत. रोमेशचंद्र दत्त यांनी भारताचा आर्थिक इतिहास हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ज्या-ज्या वेळी भारताने मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले, त्यावेळी भारतामध्ये सुवर्ण युगाची पहाट झाली. प्राचीन काळी गुप्तकाळातील सुवर्णयुग असो की, मध्य युगातील छत्रपती शिवाजी महाराज आणि विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा काळ असो. यावेळी भारताने मुक्त व्यापाराचे धाडसी पाऊल टाकले होते. त्यामुळे जगातील संपत्तीचा भारताकडे ओघ वळला आणि भारतामध्ये संपन्नतेचे पर्व सुरू झाले. भूतपूर्व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात 1990 या दशकात सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरण पर्वातील हा सर्वश्रेष्ठ बिंदू होय. किंबहुना उदारीकरणाच्या महापर्वातील हे यश शिखर म्हटले पाहिजे. आता जगातील अनेक देश ब्रिटनच्या पावलावर पावले टाकून भारताशी मुक्त व्यापार करण्यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकाकडे झेपावण्यासाठी समर्थ व सशक्त होऊ शकेल.
ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी हा करार एक नवे प्रगमनशील पाऊल आहे, असे म्हटले आहे. या करारासाठी दोन्ही बाजूच्या तज्ञांनी गेली तीन वर्षे अहोरात्र परिश्रम करून जी मेहनत घेतली त्याचे हे मधुर फलित आहे. हे त्यांनी केलेले सूत्रकथन अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी या करारासाठी दाखविलेली दूरदृष्टी भारताच्या वाढत्या प्रभुत्वाची साक्ष आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात या करारामुळे शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार तसेच नवउद्योजक आणि देशाचे भवितव्य घडविण्यासाठी सतत अग्रेसर असलेल्या युवाशक्तीचा त्यामुळे मोठा लाभ होईल असे संकेत दिले आहेत, ते अर्थपूर्ण आहेत. उभयनेत्यांनी या कराराचे गोडवे गाणे साहजिक आहे. परंतु, जगातील आर्थिक समीक्षकांनी या कराराचे समीक्षात्मक दृष्टीने मूल्यमापन करून स्वागत केले आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
कराराची उजवी बाजू
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराची सर्वात उजवी आणि उजळ बाजू काय असेल तर या करारामुळे दोन्ही देशातील अर्थव्यवस्थेला नवे चैतन्य लाभणार आहे. विशेषत: भारत इंग्लंडमध्ये दहा लाख रोजगार निर्मितीला सहाय्य होईल आणि भारतीय तरुण उद्योजक तसेच कुशल तंत्रज्ञ यांना नवोपक्रमाच्या आधारे अनंत आकाशात झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ लाभू शकेल. या कराराची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे उभय देशातील व्यापार हा पुढील दशकात दुप्पट होईल आणि त्यामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांना नवसंजीवनी लाभू शकेल. या कराराचे आणखी एक महत्त्व असे की, 99 टक्के भारतीय निर्यात वस्तूंवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्याचा फायदा भारतामध्ये लघु व मध्यम उद्योगांना होईल आणि निर्यात वाढीला जबरदस्त चालना मिळेल. विशेषत: आभूषण आणि अलंकार उद्योग तसेच वस्त्राsद्योग पादत्राणांचा उद्योग, औषधी व रसायने तसेच आयुष्य मंत्रालयाची आयुर्वेद उत्पादने यांनाही मोठी बाजारपेठ प्राप्त होईल. या त्याचा लाभ करारामुळे कोणकोणत्या वस्तू व सेवांची ब्रिटनमध्ये मागणी वाढेल आणि भारतीयांसाठी कोणत्या वस्तू स्वस्त होतील याची चर्चा करण्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार 2030 पर्यंत दुप्पट होणार.
या नव्या मुक्त व्यापार करारामुळे भारताला संपूर्ण युरोपच्या व्यापाराचे दार आपोआप उघडले जाणार आहे. त्यामुळे भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. या करारामुळे भारतातील हिरे व मौल्यवान दागिन्यांच्या उद्योगांना नवी संजीवनी मिळेल तर इंग्लंडमध्ये भारतीय वस्त्र, अन्न, खाद्यपदार्थ आणि पादत्राणे इंग्लंडमध्ये अल्पदरात मिळतील, असा दुहेरी फायदा आहे. युरोपचे उघडले द्वार हे ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी म्हटल्याप्रमाणे ब्रेक्झिट नंतर ब्रिटनने केलेला हा सर्वात मोठा करार आहे. विशेष म्हणजे गेली तीन वर्षे ब्रिटनमधील मुत्सद्दी आणि धोरण नियोजक या कराराची रूपरेषा ठरविण्यासाठी अभ्यास करत होते. भारत आणि ब्रिटनमधील उच्चस्तरीय शिष्टमंडळामध्ये अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आणि त्यानंतर या करारास अंतिम रूप देण्यात आले आहे. विशेषत: या करारामुळे पुढील दहा वर्षात भारत-ब्रिटन दरम्यानचा व्यापार हा 2030 पर्यंत 10 अब्ज कोटी रुपयापर्यंत पोहोचणार आहे तसेच आता 99 टक्के भारतीय वस्तू करमुक्त होणार आहेत. त्यामुळे भारतीय व्यापारी, उद्योजक आणि नवोन्मेष प्रतिभाशाली स्टार्टअप यांच्या उत्पादन व सेवांना ब्रिटनच्या बाजारपेठेत मोठी संधी प्राप्त होईल. शिवाय माहिती तंत्रज्ञान कृत्रिम प्रज्ञा आणि इनोव्हेशन तसेच क्रिटिकल इंजिनियरिंग या क्षेत्रातील संधी सुद्धा अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. खुद्द ब्रिटनमध्ये तत्काळ 2200 बेकारांना भारतीय उद्योगातून रोजगार मिळणार आहे, तर भारतामध्ये सुद्धा वस्त्राsद्योग, हिरे, आभूषणे तसेच पादत्राणे इत्यादी क्षेत्रातील रोजगार संधी वाढतील आणि या क्षेत्रात तरुण उद्योजकांना अधिक चांगल्या प्रकारे आपला पराक्रम गाजविण्यासाठी संधी प्राप्त होणार आहेत. भारतातील जी उत्पादने व सेवा आयएसओ 9000 सारख्या प्रमाणपत्रांचे धारण करून गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्कृष्टता या तत्त्वांचा परिपोष करत आहेत, त्यांना युरोपीय बाजारपेठेत ब्रिटनच्या माध्यमातून प्रवेश मिळणे सोपे होणार आहे.
नव्या संधींची पहाट
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील उद्योजक, व्यापारी तसेच शिक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये नव्या संधींची पहाट होत आहे. भारतामध्ये सेवा क्षेत्रात नवे 60 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत तसेच वस्त्राsद्योग, कापड, औषधे, आयुर्वेद यासारख्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील.
विशेषत: भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये नव्या रोजगार संधी या करारामुळे उपलब्ध होणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नवे स्टार्टअप उभे राहतील. यामुळे नव्या संधी प्राप्त होतील. मुक्त व्यापारामुळे मूल्य साखळी व पुरवठा साखळी अधिक लवचिक होईल आणि नव्या बाजारपेठा प्राप्त करणे उद्योजकांना सहज शक्य होऊ शकेल तसेच पुढील वीस वर्षात भारतीयांना इंग्लंडमध्ये रोजगार मिळवणे सोपे जाईल. भारतामध्ये या व्यापार करारामुळे पन्नास दशलक्ष नवे रोजगार लघु व मध्यम उद्योगात उभे राहतील. ही एक साखळी प्रक्रिया आहे. आपल्या वस्तू व सेवांना जगात जेवढी मागणी वाढते, तेवढी उत्पादन क्षमता उंचविण्यासाठी उद्योग-धंदे अधिक तेजाळू लागतात. उभय राष्ट्रांनी एकमेकांच्या बाजारपेठा आणि व्यापाराचे नियम सैल केल्यामुळे होणारे फायदे हे अनेक क्षेत्रात गतीवर्धक ठरू शकतील. हिरे उद्योग असो ऑटोमोबाईल उद्योग असो, की औषध निर्मिती उद्योग असो. या सर्व क्षेत्रात आपल्या उद्योगाला नव्या संधी लागू शकतात. आपल्या बाजारपेठा विदेशी उद्योग व वस्तूंना खुल्या केल्यामुळे अंतर्गत बाजारपेठेत सुद्धा स्पर्धा वाढेल आणि भारतीय उद्योग गुणवत्तेच्या दिशेने प्रयत्न करून आपल्या वस्तू व सेवा जगामध्ये उच्च दर्जाच्या आधारे स्पर्धेत भक्कमपणे उभे राहून पोचविण्याचा प्रयत्न करू लागतील, हे एक नवे आव्हान आहे. आपल्या कृषी क्षेत्रातील उत्पादनांना सुद्धा नवी बाजारपेठ प्राप्त होईल आणि खाद्यपदार्थ सुद्धा युरोपीय बाजारपेठेत अधिक दमदारपणे उभे राहू शकतील. विशेषत: या नव्या करारामुळे भारताला ब्रिटनकडून प्रामुख्याने वैद्यकीय उपकरणे तसेच एरोस्पेस भाग अल्प दरात मिळतील. त्यांना कमी भारतीय शुल्कांचा सामना करून भारतात प्रवेश मिळू शकेल, ही सुद्धा आरोग्य क्षेत्रात मोठी उपलब्धी आहे
फलश्रुती काय?
भारत-इंग्लंड मुक्त व्यापार कराराची फलश्रुती काय असेल तर प्रामुख्याने तीन बिंदूंवर अधिक भर देण्यात आला आहे. विकास आणि रोजगाराची उपलब्धी तसेच तंत्रज्ञान व सुरक्षा क्षेत्रात मजबुती भविष्यात हवामान बदलामुळे निर्माण होणारे प्रश्न आणि सुरक्षा या तीन क्षेत्रांवर दोन्ही पंतप्रधानांनी केलेल्या चर्चेत विशेष भर दिला आहे. शिवाय ब्रिटनचे राजे तिसरे जॉर्ज यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधानांनी संरक्षण ऊर्जा, शिक्षण तसेच आयुर्वेद या क्षेत्रातील सहकार्य सुद्धा अधोरेखित केले आहे. दोन्ही देशांनी भूपक्षीयता आणि बहुध्रुवी जग या कल्पनेवर भर दिला आणि जागतिक शांतता आणि प्रादेशिक प्रश्नावर उपयुक्त चर्चा केली. तसेच सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याच्या कल्पनेस सक्रिय पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांमध्ये समकालीन वास्तव प्रतिबिंबित व्हावे, असा आग्रहही दोन्ही देशांनी धरला आहे. दहशतवादाच्या बाबतीत दुहेरी मापदंड असता कामा नये, ही समान भूमिका आहे तसेच आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाबाबत भारताची भूमिका ब्रिटनने उचलून धरली आहे. आजच्या युगात विस्ताराची नव्हे, तर विकासाची गरज आहे, हे सूत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराची भक्कम बैठक तयार केली आहे, हेच या कराराचे खरे यश आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर








