केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : जी 20 शिखर परिषदेच्या आरोग्य कार्य गटाची दुसरी बैठक पणजीत सुरु
पणजी : जी 20 या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेच्या आरोग्य कार्य गटाच्या दुसऱ्या बैठकीला काल सोमवारी पणजीत सुरूवात झाली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी त्यात मार्गदर्शन केले. गेल्या वर्षभरात 1.4 दशलक्ष आरोग्य क्षेत्रातील निगडीत पर्यटकांनी भारत देशास भेट दिली असून आता हा देश आरोग्य पर्यटनातील एक अव्वल स्थान बनल्याचा दावा त्यांनी केला आहे. आरोग्य क्षेत्रातील पर्यटनास प्रोत्साहन देण्यात येत असून भारताची त्यात प्रगती होत आहे. जागतिक आरोग्य आणि त्यातील पर्यटन यासाठी एकत्रितपणे योगदान देण्याबाबत अर्थपूर्ण चर्चा करण्याचे आवाहन नाईक यांनी केले.
महमारी, आपत्ती प्रतिबंधासाठी वित्तपुरवठा पडतो कमी
आपल्या संबोधनात श्रीपाद नाईक यांनी महामारी व आपत्कालीन सज्जता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असून त्यांच्या प्रतिबंधासाठी वित्तपुरवठा कमी होतो, याकडे लक्ष वेधले. प्रयोगशाळा प्रणाली, सार्वजनिक आरोग्य, कर्मचारी बळकटीकरण यावर लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे आहे. महामारी निधीच्या प्रस्तावाचे भारताकडून स्वागत आहे, असे त्यांनी नमूद केले. जागतिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच विविध आरोग्य उपक्रमांना जोडण्यासाठी जी 20 सदस्य राष्ट्रांनी काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
आरोग्य आव्हानांवर तोडग्यासाठी प्राधान्य
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची बैठकीला उपस्थिती होती. भारत देशाचे जी 20 प्राधान्यक्रम सर्वसमावेशक, समानता व सुधारणावर भर देणारे आहेत तसेच ते पुढील आरोग्य क्षेत्रातील आव्हानावर तोडगा काढण्यासाठी योग्य आहेत, असे निवेदन त्यांनी केले.
आरोग्यात गुंतवणूक वाढविण्याची गरज
महामारीचा धोका कमी करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात अधिक गुंतवणूक करणे काळाची गरज आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नमूद केले. लस उपचार याची उपलब्धता निश्चित करून कोरोना प्रतिबंधक करण्यावर उपाययोजना आखा, असे आवाहनही पवार यांनी केले. जी 20 सदस्य देशांचे परदेशी प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था मंच यांचे प्रतिनिधी, औषध उत्पादन विभाग सचिव एस. अपर्णा, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल, कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला हजर आहेत. बुधवार दि. 19 एप्रिलपर्यंत म्हणजे एकूण तीन दिवस ती बैठक चालणार असून बांबोळी येथील ग्रँड हयातमध्ये ती चालू आहे.









