राकेश कुमारची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक, भारताला एकूण 9 पदके
वृत्तसंस्था/बँकॉक
येथे झालेल्या आशियाई पॅरातिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या राकेश कुमारने मिळविलेल्या हॅट्ट्रिक सुवर्णपदकाच्या जोरावर भारताने दक्षिण कोरियाला मागे टाकत पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. भारताने एकूण 9 पदके मिळविली असून त्यात 4 सुवर्ण, 4 रौप्य व एक कांस्यपदकाचा समावेश आहे.
दक्षिण कोरियाने पाच पदकांसह (3-1-1) दुसरे स्थान मिळविले. हांगझाऊ पॅरा आशियाई स्पर्धेत रौप्य मिळविलेल्या 38 वर्षीय राकेशने जबरदस्त कामगिरी करीत दोन गुणांची पिछाडी भरून काढत पुरुषांच्या खुल्या कंपाऊंड प्रकारात इंडोनेशियाच्या केन स्वागुमिलांगचा 145-144 असा पराभव केला. त्याआधी राकेशने सुरज सिंगच्या साथीने पुरुषांच्या कंपाऊंड खुल्या सांघिक प्रकारात चिनी तैपेईच्या चुंग हुंग वु व चिहृ चियांग चँग यांच्यावर 147-144 अशी मात करीत सुवर्ण पटकावले. त्यानंतर राकेशने मिश्र सांघिक प्रकारातही शीतल देवीसमवेत सुवर्ण पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी इंडोनेशियाच्या तेओदोरा ऑडी आयुदिया फेरेली व केन स्वागुमिलांग यांचा 154-149 असा पराभव केला.
महिलांच्या कंपाऊंड ओपन सांघिक प्रकारात भारताने चौथे सुवर्ण मिळविले. शीतल देवी ज्योती यांनी अंतिम फेरीत कोरियाच्या जिन यंग जेआँग व ना समि चोई यांचा 148-137 असा एकतर्फी पराभव केला. याशिवाय भारताला चार रौप्यपदकेही मिळाली. महिलांच्या रिकर्व्ह ओपन अंतिम फेरीत भारताला इंडोनेशियाकडून टायब्रेकरवर 4-5 असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुषांच्या रिकर्व्ह दुहेरीत हरविंदर व विवेक चिकारा यांनी दक्षिण कोरियाच्या खेळाडूंकडून 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
पुरुषांच्या रिकर्व्ह डब्ल्यू 1 दुहेरीचा संघ आदिल नवीन यांच्या द.कोरियाच्या खेळाडूंकडून 122-137 असा पराभव स्वीकारावा लागल्याने तिसरे रौप्य मिळाले. शीतल देवीलाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सिंगापूरच्या नुर स्याहिदाह अलिमकडून तिला शूटऑफमध्ये 142-142 असा पराभव स्वीकारावा लागला. नियमित पाच फेऱ्यांत दोघांची बरोबरी झाल्यानंतर शूटऑफमध्येही प्रत्येकी 10 गुण झाले. पण नुरने मारलेला तीर सेंटरच्या अगदी जवळ असल्याने तिला विजेते घोषित करण्यात आले. त्याआधी महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड विभागात सरिताने आपल्याच देशाच्या ज्योतीचा पराभव करून कांस्यपदक मिळविले होते.









