मुइज्जू सरकारसोबत नवा करार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आणि मालदीव यांच्यात बिघडत्या संबंधांदरम्यान दोन्ही देशांनी नवा करार अंमलात आणण्याची घोषणा केली आहे. भारत 2024-29 दरम्यान 5 वर्षांमध्ये मालदीवच्या 175 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (एनसीजीजी)चे महासंचलाक व्ही. श्रीनिवासन आणि मालदीव सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष मोहम्मद नसीर यांनी दोन्ही देशांमधील सामंजस्य कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी द्विपक्षीय बैठक घेतली आहे. या करारावर दोन्ही देशांनी 9 ऑगस्ट रोजी मालदीवची राजधानी माले येथे स्वाक्षरी केली होती.
एनसीजीसीने मालदीव सिव्हिल सर्व्हिसेसच्या (सीएससी) गरजांच्या आधारावर मालदीवच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खास योजना निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. सीएससी मालदीवने खास विषयांमध्ये विशेष कार्यक्रमांसाठी विनंती केली असल्याने एनसीजीजी गरजेनुसार मॉड्यूल डिझाइन करणार आहे. 2024-25 मध्ये एकूण 175 नागरी सेवकांसाठी 5 कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
यापूर्वी एनसीजीसीने 1 हजार नागरीसेवकांना चालू वर्षात प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य गाठले आहे. या कार्यक्रमासाठी 2019 मध्ये करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. याच्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधिक आयोग आणि मालदीवच्या माहिती आयोग कार्यालयासाठी प्रशिक्षण देखील सामील होते. भारत आणि मालदीवमधील नवी भागीदारी सार्वजनिक धोरण आणि प्रशासन यासारख्या क्षेत्रांमध्ये मालदीवच्या नागरीसेवकांची क्षमता मजबूत करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.









