वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत 24 जानेवारीपासून कैरो येथे सुरू होणाऱ्या आणि मोसमाची सुरुवात करणाऱ्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही. कारण राष्ट्रीय महासंघ नेमबाजांना काही प्रमाणात विश्रांती देऊ इच्छित आहे आणि व्यस्त वर्षात त्यांना थकवू इच्छित नाही. या वर्षात काही पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणे बाकी आहे. तथापि, स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे आणि ज्यांनी स्पर्धेचे वेळापत्रक लक्षात घेऊन आधीच चांगल्या प्रकारे नियोजन केले होते अशा काही अव्वल नेमबाजांना मात्र या प्रकाराने थोडेसे गोंधळात टाकले आहे.
‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’चे (एनआरएआय) सरचिटणीस सुलतान सिंग यांनी सांगितले की, प्रशिक्षक, क्रीडाशास्त्र चमू आणि प्रत्येकाशी या विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. कैरो विश्वचषक स्पर्धा पिस्तूल, रायफल आणि शॉटगन या तिन्ही शाखांमध्ये होणार असून त्याची सांगता 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ‘आम्ही नेमबाजांना विश्रांती देऊ इच्छितो आणि त्यांना थकवू इच्छित नाही. आम्ही नेमबाज तसेच प्रशिक्षकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशिक्षणाच्या भागावर कोणताही निर्णय घेत नाही. सर्व नेमबाजांना याची जाणीव आहे. ते मांडलेल्या धोरणानुसार आहे’, असे सिंग म्हणाले.
‘एनआरएआय’चे साहाय्यक सचिव निमित चोप्रा यांनी प्रशिक्षकांनाही व्यस्त वर्षात नेमबाजांनी स्वत:ला थकवू नये असे वाटते, याकडे लक्ष वेधले. ‘प्रशिक्षकांना त्यांच्या नेमबाजांनी विश्रांती घ्यावी आणि सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये असे वाटते. आमच्याकडे जकार्तातील स्पर्धा आहे (ही आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रायफल/पिस्तूल गटांत 5 ते 18 जानेवारी यादरम्यान होणार आहे). यामध्ये संपूर्ण ‘अ’ संघ उतरणार आहे, असे चोप्रा म्हणाले.
जकार्ता येथील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेनंतर लगेच कैरो विश्वचषक स्पर्धा (24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी) होणार आहे. गेल्या आठवड्यातच संघ न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही ‘ब’ संघ देखील पाठवणार नाही, याचे कारण म्हणजे जर आम्ही ‘अ’ संघ पाठवला नाही आणि फक्त ‘ब’ संघ पाठवला, तर ऑलिम्पिक खेळांसाठीचे जे काही पात्रता मानांकन गुण असतात ते ‘ब’ संघ जमवू शकेल आणि पुढील वर्षी मेमध्ये जेव्हा ऑलिम्पिक निवड चाचण्या होतील तेव्हा ’अ’ संघासाठी ही प्रतिकूल बाब ठरेल. म्हणूनच आम्ही ठरवले आहे की, कैरो येथे कुठलाही संघ जाणार नाही’, असे त्यानीं सांगितले.
‘एनआरएआय’ मे महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक खेळांत सहभागी होणाऱ्या संघाची निवड करण्यासाठी चाचण्यांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यात अव्वल राहणारेच देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील. नेमबाजी खेळात ऑलिम्पिक पात्रता ही एखाद्या व्यक्तीला नव्हे, तर देशाला मिळत असते. भारत 10 ते 18 फेब्रुवारी दरम्यान स्पेनमधील ग्रेनाडा येथे होणाऱ्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक (रायफल/पिस्तूल) स्पर्धेसाठी मात्र आपला संघ पाठवणार आहे. परंतु तेथे वरिष्ठ आणि कनिष्ठ गटांमध्ये 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर एअर पिस्तूल अशा फक्त दोनच स्पर्धा होतील.









