पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी स्वाक्षरी होणार : वाणिज्यमंत्री गोयल यांचीही उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार कराराला चालू आठवड्यातच मूर्त स्वरुप मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जुलै रोजी ब्रिटनच्या दौऱ्यावर जात असून त्यांच्यासोबत वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल हेसुद्धा त्यांच्यासोबत लंडनला जातील. त्यानंतर 24 जुलै रोजी भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार आहे.
दोन्ही देशांनी 6 मे रोजी व्यापार करारासाठी वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. व्यापार करारात चामडे, शूज आणि कपडे यासारख्या श्रम-केंद्रित उत्पादनांच्या निर्यातीवरील कर काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे. तर ब्रिटनमधून व्हिस्की आणि कारची आयात स्वस्त करण्याचा प्रस्ताव आहे. या करारामुळे द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळणार असून 2030 पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट होऊन 120 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल.
व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात वाणिज्य मंत्री पंतप्रधानांसोबत असतील असे अधिकाऱ्याने सांगितले. मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर तो अंमलात येण्यापूर्वी ब्रिटिश संसद आणि भारतीय मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक असेल. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अंमलात येण्यासाठी सुमारे एक वर्ष लागेल.









