संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा : व्हिएतनामचे संरक्षणमंत्री भारताच्या दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि व्हिएतनामचे संरक्षणमंत्री जनरल फान वान गियांग यांच्यात नवी दिल्लीत येथे द्विपक्षीय चर्चा झाली आहे. व्हिएतनाम अन् भारत यांच्यातील संरक्षण संबंध वृद्धींगत करण्यासाठी द्विपक्षीय चर्चेदरम्यान अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार भारताकडून व्हिएतनामच्या नौदलाला आयएनएस कृपाण ही युद्धनौका प्रदान केली जाणार आहे. चीनची त्याच्याच क्षेत्रात कोंडी करण्याची तयारी भारत करत आहे. यानुसारच युद्धनौका प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताकडून युद्धनौका मिळाल्याने व्हिएतनामच्या नौदलाच्या सामर्थ्यात भर पडणार आहे.
यापूर्वी जून 2022 मध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामचा दौरा केला होता. तेथे दोन्ही देशांदरम्यान संरक्षण भागिदारीवर संयुक्त व्हिजन दस्तऐवज आणि म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. दक्षिण चीन समुद्रावरून चीन अन् व्हिएतनाम यांच्यात वाद आहे. चीनच्या आक्रमकतेमुळे दोन्ही देशांमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
व्हिएतनामच्या नौदलाला भारताकडून निर्मित मिसाइल कोरवेट आयएनएस कृपाण प्रदान करण्यात येणार आहे. दोन्ही देशांनी विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवरील प्रगतीचा आढावा घेतला आहे. संरक्षण उद्योग, सागरी सुरक्षा अन् बहुराष्ट्रीय सहकार्याच्या क्षेत्रातील भागिदारी वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत झाला आहे.
दोन्ही देश द्विपक्षीय संरक्षण वृद्धींगत करण्यासह दक्षिण चीन समुद्रातील स्थितीची समीक्षा करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. या क्षेत्रात चीनची वाढती आक्रमकता दिसून आली आहे. भारताचे ‘अॅक्ट ईस्ट’ धोरण अन् हिंद-प्रशांत क्षेत्रात व्हिएतनाम एक महत्त्वपूर्ण साथीदार आहे. जुलै 2007 मध्ये व्हिएतनामचे तत्कालीन पंतप्रधान गुयेन तान दुंग यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंध ‘रणनीतिक भागिदारी’च्या स्तरापर्यंत पोहोचले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय संबंध ‘समग्र रणनीतिक भागिदारी’च्या स्तरावर पोहोचले होते.









