वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वाढती लोकसंख्या व वाढते उत्पन्न या कारणास्तव भारतात तेलाची विक्री तेजीने वाढणार आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये मागणी घटणार असल्याचे संकेत आहेत. यावर्षी पाहता तेलाच्या मागणीत भारत चीनपेक्षाही पुढे जाऊ शकतो. ट्रॅफीग्युरा समुहाचे मुख्य अर्थतज्ञ साद रहीम यांनी अपेक संमेलनात वरील भाष्य केले आहे.
का वाढणार मागणी
ते म्हणाले, भारताच्या वाढीव तेलाच्या मागणीबाबत आम्ही आशावादी आहोत. यावर्षी भारताची कच्च्या तेलाची मागणी ही चीनपेक्षा अधिक राहिल, अशी चिन्हे आहेत. तज्ञांच्या माहितीनुसार भारतात तेलाची मागणी वाढत असून यासाठी शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाढते उत्पन्न व जीवनशैलीत झालेल्या सुधारणा ही कारणे सांगितली जात आहेत. यामुळे आपसुकच खासगी व व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तेलाची मागणीही वाढत आहे. तर दुसरीकडे चीनचा विचार करता तेथे कच्च्या तेलाचा खप कमी झाला आहे.
मागणीत वाढ, चिंताही
पुढील वर्षी कच्च्या तेलाची मागणी 10 लाख बॅरल दररोज इतकी वाढीव वैश्विक स्तरावर राहू शकते. पण ही मागणी जास्त वाढली नाही तर अतिरीक्त तेलाची बाजारात विक्री करण्याची समस्या उत्पन्न होऊ शकते, असेही तज्ञांनी म्हटले आहे. याबाबतीत भारत आणि चीन या दोन देशांच्या मागणीवरच तेलाच्या मागणीची गरज स्पष्ट होईल.









