काजिंद 2023 चे आजपासून आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि कजाकिस्तान यांच्यातील संयुक्त सैन्याभ्यास काजिंद-2023 चे आयोजन कजाकिस्तानच्या ओटार येथे होणार आहे. 30 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या संयुक्त सैन्याभ्यासात भाग घेण्यासाठी भारतीय सैन्य आणि वायुदलाच्या 120 सदस्यांची तुकडी रविवारी कजाकिस्तानसाठी रवाना झाली आहे.
भारतीय सैन्याच्या तुकडीत डोगरा रेजिमेंटच्या एका बटालियनच्या नेतृत्वात 90 सैनिक सामील आहेत. तर कजाकिस्तानच्या दलाचे प्रतिनिधित्व प्रामुख्यो कजाक ग्राउंड फोर्सेसच्या दक्षिण क्षेत्रीय कमांडच्या सदस्यांकडून केले जाणार आहे. या सैन्याभ्यासत दोन्ही देशांचे वायुदल देखील सामील होणार आहे. भारत आणि कजाकिस्तानचे प्रत्येकी 30 वायुसैनिक यात भाग घेणार आहेत.
दोन्ही देशांचे सैन्य दहशतवादविरोधी मोहिमांच्या संचालनासह अनेक प्रकारचे सराव करणार आहेत. यात छापेमारी, शोधमाहिमेचा समावेश असेल. सैन्याभ्यासाच्या कक्षेत मानवरहित हवाई प्रणालीचे देखील संचालन केले जाणार आहे. या सैन्याभ्यासामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान परस्परांची रणनीति, युद्धाभ्यास आणि प्रक्रियांविषयी माहिती प्राप्त करण्यास मदत मिळणार असल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
दोन्ही देशांदरम्यान वार्षिक प्रशिक्षण अभ्यासाची सुरुवात 2016 मध्ये झाली हीत. त्यादरम्यान या सैन्याभ्यासाला ‘प्रबळ दोस्तकी-16’ नाव देण्यात आले होते. परंतु 2018 मध्ये या सैन्याभ्यासाचे दाव बदलून काजिंद करण्यात आले होते.









