अमेरिकेच्या धमक्यांकडे दुर्लक्ष : पुतिन यांच्याकडून अतिरिक्त सूट मिळण्याची आशा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातील ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के कर लादला होता. त्यानंतर 27 ऑगस्टपासून आणि 25 टक्के वाढवून 50 टक्के करण्यात आला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे कर वाढवण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही भारताने हार न मानता रशियाकडून तेल खरेदी करत राहिला. त्यातच आता भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवण्याची तयारी करत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही जास्तीत जास्त सवलत देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत भारत अधिक तेल खरेदी करण्याचा विचार करत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर शुल्क वाढवले होते. भारतावरील आयातशुल्क वाढवले तर भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल, अशी अपेक्षा अमेरिकेला होती. परंतु भारताने तसे केले नाही. याचदरम्यान रशियानेही भारताला पाठिंबा देत अतिरिक्त सवलत देण्याची ऑफर दिली आहे. ब्लूमबर्गच्या मते, रशिया सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला ब्रेंट क्रूडसह उरल क्रूडचा पुरवठा करण्यास सांगत आहे. या निर्णयामुळे किंमत प्रतिबॅरल 3 ते 4 डॉलर्सने कमी होईल. काही दिवसांपूर्वी हा फरक 2.50 डॉलर्सवर पोहोचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्या बैठकीनंतर ही बातमी समोर आली आहे. भारतातील सरकारी आणि खासगी रिफायनरीजनी 11.4 दशलक्ष बॅरल रशियन तेल आयात केले आहे. तसेच, पुतिन यांनी दिलेल्या सवलतींनंतर रशियाच्या तेल आयातीत 10 ते 20 टक्के वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.
अमेरिकेने 50 टक्के शुल्क लादल्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे. भारताने आपले धोरणात्मक हितसंबंध पुढे ठेवून रशियाशी संबंध अधिक दृढ केले आहेत. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या एससीओ शिखर परिषदेत जगाने भारताचे द्विपक्षीय संबंध स्पष्टपणे दिसून आले.









